Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 29 January 2011

गोवा भाजयुमोची तिरंगा मोहीम फत्ते!

काश्मीरहून परतलेल्या कार्यकर्त्यांचे जंगी स्वागत
मडगाव, दि. २८(प्रतिनिधी): काश्मीरातील श्रीनगर येथे लाल चौकात प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकावण्याच्या मोहिमेवर गेलेला गोवा भाजयुमोचा १५० सदस्यीय चमू ‘एकता यात्रे’ची मोहीम फत्ते करून आज येथे परतला तेव्हा त्याचे अभूतपूर्व जल्लोशात स्वागत करण्यात आले.
‘भारतमाता की जय, वंदे मातरम, जो हमसे टकराएगा मिट्टीमे मिल जाएगा व काश्मीर हिंदुस्तानका ना किसीके बापका’ अशा ललकार्‍या देत येथील कोकण रेल्वे स्टेशनवर मंगला एक्सप्रेसमधून भाजयुमो कार्यकर्ते दाखल झाले तेव्हा गोवा भाजपातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या घोषणांनी सारा परिसर दणाणला.
गोवा भाजयुमोचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत व सरचिटणीस सिद्धेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील या चमूच्या स्वागतासाठी आमदार दामू नाईक, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर, माजी सभापती विलास सतरकर, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर,मडगाव भाजप मंडल अध्यक्ष चंदन नायक, भाजयुमोचे रुपेश महात्मे, सुधीर पार्सेकर उपस्थित होते. सर्वांचे त्यांनी हार घालून स्वागत केले.
डॉ. प्रमोद सावंत यांनी मोहिमेची संपूर्ण माहिती दिली. कोलकोताहून सुरू झालेल्या या एकता यात्रेचे नेतृत्व भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केले. एकूण ८५ हजार कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. त्यातील बहुतेकांना जम्मू सीमेवर अडवण्यात आले. त्यांनी बॅगेत ठेवलेले तिरंगे पोलिसांनी हिसकावून घेतले. तरीही गोव्यातून गेलेले ६ कार्यकर्ते तिरंगा घेऊन पोलिसांना चकवून लाल चौकापर्यंत गेले व त्यांनी प्रजासत्ताकदिनी तेथे तिरंगा फडकावलाच.
भाजपच्या नेत्या सौ. सुषमा स्वराज तेथे आल्या होत्या परंतु त्यांना विमानतळावरून परत पाठविले गेले. त्यामुळे उमर अब्दुल्ला सरकार नेभळट असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रीय दिनी तिरंगा फडकावणे हा प्रत्येक भारतीयाचा हक्क असून सरकारने तो हिरावून घेऊन आपली निष्क्रियता दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
सिध्देश नाईक यांनी यावेळी आपले अनुभव सांगताना ओमर अब्दुल्ला सरकारच्या सांगण्यावरून केंद्राने लादलेली ही बंदी म्हणजे हिटलरशाही असल्याचे प्रतिपादिले.
आमदार दामू नाईक यांनी उमर सरकार कमकुवत असल्याचे त्यांच्या कृतीतूनच दिसून आल्याची टीका केली. तिरंगा फडकावण्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांविरुद्ध अवसाघान करणार्‍या या सरकारचे देशभरात हसे झाल्याचे ते म्हणाले.
त्यांनी यासंदर्भात वंदे मातरमवरील बंदीची मागणी, अफजल गुरुची रेंगाळत असलेली फांशी सारखी उदाहरणे दिली. भाजप सत्तेवर आला तर संपूर्ण काश्मीरमध्ये तिरंगा फडकावला जाईल असे त्यांनी जाहीर केले. कॉंग्रेसने सतत लोकांना गृहीत धरून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न चालविला तर त्या पक्षाचा तो हात मुळापासून उखडला जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.
ऍड. नरेंद्र सावईकर यांनी या चमूचे स्वागत केले. या चमूत आत्माराम बर्वे, मनोज नायक, भावेश जांबावलीकर, दीपक नार्वेकर, भगवान हरमलकर, विनय गावकर, विशांत गावकर, दिनकर गुरव व इतरांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे ‘मंगला’मधून व अन्य गाड्यांतून आलेल्या प्रवाशांची उत्सुकता ताणली गेल्याचे चित्र दिसले.

No comments: