Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 24 January 2011

प्रमुख पोलिस ठाण्यांतील सीसीटीव्ही बंदच!

हेतुपूरस्सर नादुरूस्त?

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) ः लाखो रुपये खर्च करून राज्यातील पोलिस स्थानकात बसवण्यात आलेले ‘सीसीटीव्ही’ बंद स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या पोलिस स्थानकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कित्येक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीवरील अत्यंत महत्त्वाचे असलेल्या हणजूण पोलिस स्थानकात तर ‘सीसीटिव्ही’च बसवण्यात आलेली नाही, अशी माहिती हाती लागली आहे. खुद्द पोलिस खात्यानेच ही माहिती दिली.
पोलिस स्थानकात घडणार्‍या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही द्वारे नजर राहिल्यास आपण अडचणीत येऊ या भीतीनेच हे सीसीटिव्ही नादुरुस्त करण्यात आले आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सध्या पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे गाजत असलेले राजधानीतील पोलिस स्थानक, आगशी, म्हापसा, पेडणे, फोंडा व डिचोली या स्थानकांत बसवण्यात आलेले सीसीटिव्ही बंद आहेत. तर, जुने गोवे, कळंगुट, पर्वरी, कुळे आणि वाळपई पोलिस स्थानकांतील सीसीटिव्ही सुरू असल्याची माहिती पोलिस खात्याने दिली आहे. स्कार्लेट खून प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि त्यानंतर करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन पोलिस स्थानकात सीसीटिव्ही बसवण्यात आलेली नाही. या पोलिस स्थानकात का सीसीटिव्ही बसवण्यात आलेले नाहीत, याचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
पणजी पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर, निरीक्षकांच्या केबीन, संशयित गुन्हेगारांना ठेवण्यात येणार्‍या ठिकाणी तसेच तक्रार नोंद करून घेणार्‍या ठिकाणी बसवलेले सीसीटिव्ही बंद आहेत. हे सीसीटिव्ही सुरू असते तर, सिप्रियानो याला पोलिस कोठडीत मारहाण झाली हे सिद्ध करण्यासाठी पणजी पोलिसांना बरीच मदत झाली असती. परंतु, हे सीसीटिव्ही चालू अवस्थेत नसल्याने अनेक संशयाला वाट मोकळी झाली आहे.
बंद स्थितीत असलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचे परिश्रम पोलिस खाते का घेत नाही, यावरच शंका निर्माण झाली आहे. यापूर्वी राज्याच्या सीमेवरील चेक नाक्यावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही नादुरुस्त करण्यात आले होते. काहींवर तर, कपडा टाकून झाकून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
पोलिस स्थानकात कोणकोण व्यक्ती अधिकार्‍यांना भेटायला येतात, रात्रीच्या वेळी पोलिस स्थानकात काय घडते, लोकांशी कसे वर्तन केले जाते, तक्रार देण्यासाठी येणार्‍या लोकांना किती वेळ ताटकळत राहावे लागते, याची माहिती वरिष्ठांना लागू नये, यासाठीच लाखो रुपयांचे हे सीसीटिव्ही बंद स्थितीत आहे का, असे अनेक प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित झाले आहेत. डॉ. केतन गोवेकर यांनी माहिती हक्क कायद्यानुसार मागितलेल्या माहितीतून ही माहिती उघडकीस आली आहे.

No comments: