Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 23 January 2011

सव्वादोन लाखांचे ड्रग्ज वागातोरात जप्त

फ्रेंच नागरिकाला अटक
म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी): हणजूण पोलिसांनी आज अमली पदार्थ विरोधी कारवाई करताना पीर्रे जॉर्ज जीन आक्वारोने (४२) या फ्रेंच नागरिकास सुमारे दोन लाख १६ हजारांच्या अमली पदार्थासह ताब्यात घेतले. राज्यातील ड्रग व्यवसायाला पुरता लगाम घातला आहे, अशी राणा भीमदेवी थाटात गृहमंत्री गर्जना करत असले तरी रोज कुठे ना कुठे तरी जप्त होणार्‍या ड्रग्जवरून राज्यात या व्यवसायाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओझरात- वागातोर येथील ओझरेश्‍वर जनरल स्टोअर्स दुकानाशेजारी एक संशयित पर्यटक अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आला असून तो ग्राहकाच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती हणजूण पोलिसांना मिळाली. हणजूणचे उपनिरीक्षक सिनारी यांच्यासह अनंत गावकर, केशव नाईक, उमेश पावस्कर, बाबू मदनवार, सुहास जोशी नीतेश मळगावकर आणि समीर गावस यांनी सापळा रचून संशयित फ्रेंच पर्यटकाला ताब्यात घेतले. त्यानंतर झडती घेतली असता त्याच्याजवळील बॅगेत सुमारे १ लाख २६ हजार किमतीचा १ किलो २६ ग्राम चरस, ४५ हजारांचे १० ग्राम एमडीएमए आणि ५५ हजार रुपयांची ११ ग्राम ब्राऊन शुगर असे अमली पदार्थ सापडले. त्याच्याजवळ २२ हजार ५४० रुपये नगदही आढळून आले. हणजूण पोलिसांनी सदर संशयिताला अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केली व न्यायालयात हजर करून सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली.

No comments: