नव्या कोऱ्या डिओसह संशयिताला अटक
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- होंडा कंपनीने उत्पादन केलेली आणि विस्तार व्हील्स प्रा. लि. (मळा पणजी) या होंडा दुचाकी शोरूममध्ये विक्रीसाठी येणारी ५ डिओ दुचाकी वाहने गायब केल्याच्या संशयावरून पोलिसांनी तेथील कर्मचारी प्रणय नाईक याला अटक केली आहे. विस्तारचे विष्णू तारकर यांनी याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता प्रणय घेऊन फिरत असलेल्या डिओ दुचाकीची वाहतूक खात्यात नोंदणी झालेली नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सदर प्रकार उघडकीस आला. याविषयी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जून ते ऑक्टोबर दरम्यान विस्तार आस्थापनेतून एकूण ५ दुचाक्या गायब झाल्या होत्या. मूळ कारखान्यात उत्पादन झाल्यानंतर एका ट्रकमध्ये ५० दुचाक्यांचा "लॉट' विस्तारमध्ये पाठवला जात होता. या "लॉट'मधून एखादी दुचाकी हळूच पळवली जात होती. या प्रकारात आस्थापनातील कर्मचारी गुंतलेला असावा असा संशय आल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी साल्वादोर दुमुंद येथील प्रणय याच्यावर पाळत ठेवून सापळा रचला. प्रणय चालवत असलेल्याची डिओ दुचाकीची वाहतूक विभागाकडे नोंद न झाल्याने पोलिसांनी त्याला दुचाकीसह अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून आणखी दोन डिओ ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अन्य दोन दुचाक्या त्याने परस्पर विकल्याचा संशय असून पोलिस त्याबाबत तपास करत आहेत. पोलिसांनी भा.दं.सं. ३८१ खाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. निरीक्षक चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उल्हास खोत, शिपाई श्रीराम साळगावकर, तीर्थराज म्हामल, शेखर आमोणकर, प्रकाश कुळेकर, गिरीश राऊळ, सुदेश तारी, राया मांद्रेकर यांनी सदर कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.
Sunday, 7 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment