पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): राजकीय नेत्यांमध्ये "खुर्ची'साठी रस्सीखेच असते, हे सर्वश्रुत आहेच. पण, गोमेकॉ इस्पितळातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून "तू तू मै मै' सुरू होऊन प्रकरण पोलिस स्थानकापर्यंत पोचल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
रक्तपेढी विभागात असलेल्या या दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांची गेल्या काही दिवसापूर्वी बरीच जुंपली. कारण होते, या विभागात असलेल्या खुर्चीवर कोण बसणार? एक वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ असल्याने त्याने आपल्यासाठी एक टेबल आणि एक खुर्ची ठेवली होती. तर, दुसऱ्या अधिकाऱ्याने आपणही खुर्चीवर बसणार असा हट्ट धरला. यामुळे दि. १ नोव्हेंबर रोजी या दोघांमध्ये बरीच बाचाबाची सुरू झाली. यावेळी या विभागप्रमुखांची त्या ठिकाणी उपस्थिती होती. परंतु, इस्पितळाचे डीन डॉ.जिंदाल हे रजेवर असल्याने या भांडणावर कोणी आणि कसा तोडगा काढावा, या विवंचनेत सध्या हा ताबा सांभाळणारे डीन गुंतलेल्या आहेत.
दरम्यान, हे भांडण "शिव्या शापांवर' पोचल्याने दोन्ही अधिकाऱ्यांनी थेट आगशी पोलिस स्थानक गाठून परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी सरळ भूमिका घेत दोघांवरही गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी दिली. सध्या या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण नसल्यानेच हे भांडणाचे प्रकार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी एक रुग्णाला वेगळ्याच गटाचे रक्त चढवल्याने आता त्या विभागात पॅथॉलॉजी तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर कामाचा अधिक बोजा नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Wednesday, 10 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment