Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 7 November 2010

"ताज'मधील मुक्काम दहशतवाद्यांना कठोर इशारा : ओबामा

मुंबई, दि. ६ - २६/११ ला ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी रक्ताचे पाट वाहिले, त्याच हॉटेलमध्ये माझा मुक्काम म्हणजे दहशतवाद्यांना दिलेला कठोर इशारा आहे, असे प्रतिपादन सध्या भारत भेटीवर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले असून, मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बराक ओबामांचे आपल्या पहिल्या भारत भेटीवर आज दुपारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर काही वेळातच ओबामा यांनी ताज हॉटेलमध्ये जाऊन २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट दिली आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पुस्तिकेत आपला अभिप्राय नोंदवला. दहशतवादविरोधातल्या लढाईत दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे, असेही ओबामा यांनी ताज हॉटेलमध्ये उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
मुंबईसारख्या ऐतिहासिक आणि गतिमान शहरापासून आपला भारत दौरा सुरू करण्याबाबत वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली. ताज हॉटेलमध्ये मुक्काम करून आपण दहशतवादी संघटनांना इशारा देऊ इच्छिता का, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता आणि मी "हो' असे उत्तर दिले होते. ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी ६० तास केलेल्या धिंगाण्यात आपले कुटुंब गमावल्यानंतरही अजूनपर्यंत याच ठिकाणी कार्यरत असलेले हॉटेलचे सरव्यवस्थापक कर्मवीर कांग यांच्या धैर्याचा ओबामा यांनी विशेष उल्लेख केला. "ताज हे सर्व भारतीयांच्या शक्तीचे प्रतीक आहे', असेही ओबामा पुढे म्हणाले.
"आम्ही २६/११ च्या अतिशय निर्घृण अशा हत्याकांडाच्या स्मृती कधीही विसरू शकणार नाही. गेट वे ऑफ इंडिया पाठीशी असतानाच या दिवशी ताज हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून आगीचे लोट बाहेर पडत होते. हिंदू, शीख, ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लीम धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात. हे ज्यांच्या डोळ्यात खुपते त्यांनीच वेगवेगळ्या समुदायांमध्ये फूट पाडण्यासाठी हे कृत्य केले. आजच्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यात दहशतवादविरोधी लढाईत सहकार्य आणखी वाढले आहे. आमच्या जनतेचे जीवन सुरक्षित करण्यासाठी अतिरेकी हल्ले होऊ नये म्हणून दोन्ही देशांमध्ये गुप्त सूचनांचे मोठ्याप्रमाणात आदानप्रदान होत आहे. या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने मी डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी चर्चेस उत्सुक आहे, असेही ते म्हणाले.




महात्मा गांधी संपूर्ण जगाचे हीरो
ताज हॉटेलमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर बराक ओबामा यांच्या ताफ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निवास्थान असलेल्या मणिभवनकडे कूच केले. "महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे हीरो होते', असा अभिप्राय ओबामा यांनी मणिभवनच्या पुस्तिकेत नोंदवला.
"महात्मा गांधींच्या जीवनात अमूल्य स्थान असलेल्या या वास्तूला भेट दिल्याने मला आत्यंतिक आनंद झाला. महात्मा गांधींच्या जीवनातून मलाही प्रेरणा मिळाली आहे. एवढेच नव्हे तर महात्मा गांधींनी मार्टिन ल्युथर किंगसह अमेरिकन आणि आफ्रिकन अमेरिकन जनतेलाही प्रेरणा दिली, असेही ओबामा यांनी पुस्तिकेल लिहिले आहे.

शाळकरी मुलांसोबत आज दिवाळी
भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या उद्या दुसऱ्या दिवशी बराक ओबामा शाळकरी मुलांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ताजमहाल हॉटेलला लागूनच असलेल्या होली नेम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा दिवाळी साजरी करणार आहेत. ओबामा यांच्या भेटीनिमित्त या शाळेत विशेष रांगोळी काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी काढण्यात आलेल्या मोराच्या छायाचित्रात रंग भरण्याची विनंती या जगातील सगळ्यात प्रभावी जोडप्याला यावेळी करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरी केल्यानंतर बराक ओबामा प्रदूषण आणि पर्यावरणावर आयोजित करण्यात आलेल्या विज्ञात प्रदर्शनालाही भेट देणार आहेत. विज्ञात प्रदर्शनात सहभागी झालेले १६ निवडक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी ओबामा आणि त्यांच्या पत्नी संवाद साधणार आहेत. यावेळी शाळेतील विद्यार्थी कोळी नृत्यासह इतर पारंपरिक नृत्य करणार आहेत, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

No comments: