Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 13 November 2010

'कोकेन कोस्ट'वरील पोलिसांना 'डोस'

गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): गोवा राज्य हे अंमलीपदार्थ आणि वेश्या व्यवसायाचा अड्डा झाल्याचे नमूद करणाऱ्या इंडिया टुडेच्या "कव्हर स्टोरी'ची पोलिस खात्याने बरीच धास्ती घेतली असून अंमलीपदार्थ आणि वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश सर्व पोलिस स्थानकांना देण्यात आले आहेत. "इंडिया टुडे' या राष्ट्रीय मासिकावर "गोवा, सेक्स ऍण्ड माफिया ऑन कोकेन कोस्ट' या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली होती. या लेखाचे कात्रण काढून सर्व पोलिस स्थानकांना पाठवण्यात आले आहे. तसेच, या लेखाचे वाचन करण्याची सूचना प्रत्येक पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांना देण्यात आली आहे. गोव्याचे नाम बदनाम करणाऱ्यांविरुद्ध जास्ती जास्त गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
इंडिया टुडेच्या या "कव्हर स्टोरी'मुळे केंद्राकडूनही राज्य गृहखात्याला बरीच फटकार मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात कशा प्रकारे अंमलीपदार्थांचा व्यापार आणि वेश्या व्यवसाय सुरू आहे याची तपशीलवार माहिती या लेखाद्वारे उघड करण्यात आली आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने गोव्याची प्रतिमा जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे तेवढीच पोलिस खात्याचीही आहे. यामुळे पोलिस खात्याने कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली न येता अशा प्रकारावर आळा घालण्याची अपेक्षा गोमंतकीयांनी बाळगली आहे.
राज्यात कुठे अंमलीपदार्थांचा व्यवहार चालतो आणि तो कोण चालवतो याची पूर्ण कल्पना पोलिसांना आहे. तसेच, वेश्या व्यवसायात गुंतलेल्या प्रस्थांची आणि त्यांच्या ठिकाणांचीही पुरेपूर माहिती पोलिस खात्याला आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून पोलिस त्यांना अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचे आरोप होऊ लागेल आहेत. यामुळे हे "धंदे' राजरोसपणे पोलिसांदेखत सुरू असल्याचे सत्य आता लपून राहिलेले नाही. याचीच जाण पोलिस खात्याला झाल्याने आत पोलिस खात्याच्या वरिष्ठांनी या लेखाच्या कात्रणांसह कडक पावले उचलण्याचे आदेश असलेले पत्र पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले आहे. परंतु, पोलिस अधिकारी या आदेशाचे किती पालन करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
राज्यात पर्यटन मोसम सुरू झाला असून अंमलीपदार्थांच्या विक्रीला आणि वेश्या व्यवसायालाही ऊत आला आहे. तसेच, किनारी भागात रात्रीच्या पार्ट्याही कर्णकर्कश आवाजात "रंगत' आहेत. या पार्ट्यांच्या आयोजनात पोलिसांचे किती साहाय्य असते हे गोवेकरांना सर्वज्ञात आहे. येत्या महिन्यात राज्यात वादग्रस्त ठरलेल्या "सनबर्न' पार्टीचे पुन्हा आयोजन होत असून या पार्टीवर पोलिस खाते निर्बंध घालणार का? याबाबत गृहखात्याने "चुप्पी' साधली आहे.

No comments: