भाजपची सरकारवर कडाडून टीका
पणजी, दि. ११(प्रतिनिधी): गोमंतभूमीवर साडेचारशी वर्षे राबवलोल्या हुकूमशाहीची राजवटीची पंचशताब्दी गोव्यात साजरी करण्याची पोर्तुगालची योजना आहे. त्यानिमित्त पोर्तुगालहून उद्या १२ रोजी गोव्यात दाखल होणाऱ्या "एन.आर.पी सां ग्रेस ' नामक जहाजाच्या स्वागत सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत व राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू हजर राहिले तर खबरदार, असा खणखणीत इशारा आज गोवा प्रदेश भाजपतर्फे देण्यात आला. पोर्तुगिजांच्या हुकूमशाही राजवटीचा उदोउदो करणे ही अत्यंत शरमेची व निर्लज्जपणाची हद्द गाठणारीच घटना ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
आज भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याविषयावरून सरकारला कडक शब्दांत खडसावले. याप्रसंगी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हजर होते. स्वाभिमानी व राष्ट्रवादी गोमंतकीयांच्या नाकावर टिच्चून आणि स्वातंत्रसैनिकांची मानहानी करून राज्यपाल व मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहिले तर पुढील परिणामांना तोंड देण्याची तयारी त्यांनी ठेवावी, असेही यावेळी प्रा.पार्सेकर यांनी बजावले.
पोर्तुगीज राजवटीचे उदात्तीकरण करीत असाल तर गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा या सरकारला अधिकार तो कोणता,असा खडा सवाल प्रा. पार्सेकर यांनी केला.व्यक्तिगत पातळीवर या कार्यक्रमाला हजर राहण्यास कुणाचाही आक्षेप नाही; परंतु लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री व भारतीय घटनेचे रक्षक तथा केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून वावरणारे राज्यपाल यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही गोवा मुक्तिसंग्रामातील तमाम हुतात्मांची व स्वातंत्रसैनिकांची अवहेलनाच ठरेल, असेही यावेळी ते म्हणाले.
हा विषय गोव्याच्या स्वाभिमान व प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व राज्यपालांनी या कार्यक्रमापासून स्वतःला अलिप्त ठेवणेच योग्य ठरेल, असा सल्लाही प्रा. पार्सेकर यांनी दिला. एवढा विरोध डावलूनही मुख्यमंत्री व राज्यपाल सहभागी झाले तर मात्र त्याला गोमंतकीय जनताच उत्तर देईल,असा टोलाही त्यांनी हाणला.
गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या तयारीसाठी अद्याप काहीच केलेले नाही. केंद्र सरकारकडून दोनशे कोटी रुपयांचे पॅकेज मागितले आहे. मुळात हा पैसा खरोखरच किती जणांच्या खिशात जाईल हे काही सांगता येणार नाही,असा आरोपही प्रा.पार्सेकर यांनी केला. पोर्तुगिजांनी आपल्या राजवटीत इथल्या नागरिकांवर केलेला अत्याचार, धर्मांतराचे पेरलेले विष हा काळा इतिहास अजूनही लोकांच्या मनात ठसठसत आहे. अशावेळी मुळात आपल्या राजवटीची पाचशे वर्षे साजरा करण्याचा प्रकार व त्यात राज्य सरकारने सहभाग घेण्याची कृतीच निषेधार्ह असल्याची टीका प्रा. पार्सेकर यांनी केली.
Friday, 12 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment