Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 November 2010

चव्हाण, कलमाडींवरील कारवाई ही घोटाळ्याची कबुलीच :गडकरी

नवी दिल्ली, दि. ९ : 'आदर्श' आणि "राष्ट्रकुल' घोटाळाप्रकरणी अनुक्रमे अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्यावर कारवाई करून कॉंग्रेसने त्याबाबत भ्रष्टाचाराची कबुलीच दिली असल्याचे सांगून भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी निव्वळ या कारवाईवर न थांबता सर्व दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
आज एका पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले की, चव्हाणांचा राजीनामा स्वीकारणे आणि कलमाडींना पदावरून हाकलणे यावरून कॉंग्रेसने एकप्रकारे हे घोटाळे झाले असल्याची कबुलीच दिली आहे. राष्ट्रकुलप्रकरणी केवळ कलमाडींवर कारवाई करून भागणार नाही. याबाबतच्या सर्व शिफारशी, मागण्या मान्य करणाऱ्या आणि आयोजन समितीला अंकुश न घालू शकणाऱ्या या विषयीच्या मंत्रिगटाचीही भूमिका फारशी स्वच्छ, पारदर्शक नाही. राष्ट्रकुलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे राहुल गांधी हे स्वत: सदस्य होते. या सर्व घटकांकडेही गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.
कोणतीही चौकशी न करता पंतप्रधान कार्यालयाने आणि मंत्रिगटाने राष्ट्रकुलसाठीच्या अवाढव्य खर्चाला मंजुरीच कशी दिली, असा सवाल उपस्थित करून गडकरी म्हणाले की, हा मुद्दा विरोधी पक्ष संसदेत या अधिवेशनात नक्कीच उपस्थित करणार आहेत. जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील टाइल्सदेखील "इम्पोर्टेड' होत्या. त्या ऑस्ट्रेलियाहून मागविण्यात आल्या आणि त्या लावण्याचे कामही विदेशी फर्मलाच देण्यात आले. बाथरूममधील टाइल्स लावण्याइतकेही भारतात कुशल कारागीर नाहीत का, असा प्रश्नही भाजपाध्यक्षांनी केला.
राष्ट्रकुलसाठीच्या बांधकामाच्या निविदा जारी करताना त्यातील अटी फारच चमत्कारिक होत्या. त्यात ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलचे काम आधी केलेले असले पाहिजे किंवा त्या कामाचा अनुभव पाहिजे, असे नमूद करण्यात आले होते. याच ठिकाणी भारतातील सर्व फर्म अपात्र ठरल्या. किंबहुना, त्यांना अपात्र ठरविण्याचा हा घाट असल्याचा आरोपही गडकरींनी केला.
आदर्शचा "अ' देखील माहिती नाही
आदर्श घोटाळा प्रकरणी आपलेही नाव गोवले जात आहे, याविषयी विचारले असता गडकरी म्हणाले की, याविषयीचे सर्व वृत्त निराधार आहेत. आदर्शचा "अ' देखील मला माहिती नाही.

No comments: