Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 November 2010

अशोकरावांचा राजीनामा मंजूर

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची आज निवड
मुंबई, दि. ९ : 'आदर्श' सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खुर्ची सोडावी लागली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर केला असून मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यपाल शंकरनारायणन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक झाली. या बैठकीत नवा मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. यामुळे नवीन मुख्यमंत्र्याची निवड बुधवारी दिल्लीतून होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांची राज्यपालांनी महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिवाळीआधी आपला राजीनामा सोनिया गांधी यांना सादर केला होता मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या मुंबई-दिल्लीच्या दौऱ्यामुळे त्यावरील निर्णय घेण्यात आला नव्हता. आज ओबामांचा दौरा संपताच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर करत सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रासाठी नव्या नेतृत्वाचा शोध सुरू केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक यांच्या नावांची चर्चा सुरू होती.
बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र असलेले राधाकृष्ण हे शिवसेनेत असताना युती सरकारच्या काळातही मंत्री होते. त्यावेळच्या कारकिर्दीतही त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांच्यासाठी स्वतः अशोक चव्हाण बरेच प्रयत्न करत आहेत. तडफदार नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. विद्यमान सरकारमधली त्यांची कामगिरी आणि दिल्लीतून विलासराव देशमुख यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांकडून त्यांना मिळणारे पाठबळ यामुळे ते मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील एक तगडे दावेदार झाले आहेत. प्रदीर्घ काळ दिल्लीत राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा महाराष्ट्राचा राजकारणाशी थेटपणे कमी संबंध आहे. पण सध्या राज्यातील बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना स्वच्छ चारित्र्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील मुख्यमंत्रिपदासाठीचा एक सक्षम पर्याय म्हणून विचार होत असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्रीही बदलणार?
कॉंग्रेसने "आदर्श'प्रकरणी अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन नवा मुख्यमंत्री राज्याला देण्याचा निर्णय घेतला असताना सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही उपमुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांची वर्णी या पदासाठी लागू शकते अशी शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे.

No comments: