Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 13 November 2010

मरणासन्न शिरगावावर अखेरचा घाव

कोमुनिदादकडून लाखो चौरसमीटर जागा खाण उद्योजकांच्या घशात
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): डिचोली तालुक्यातील शिरगाव कोमुनिदाद समितीने खाण उद्योजकांच्या आमिषाला बळी पडून आता गावाच्या अस्तित्वाचा शेवटचा तुकडा म्हणून शिल्लक राहिलेली लाखो चौरसमीटर जागा दोन बड्या खाण उद्योजकांना २० वर्षांच्या करारावर आंदण दिल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. या वादग्रस्त निर्णयामुळे हा गाव आता पूर्णतः खाण उद्योगाच्या कवेत नामशेष होण्याचीच भीती निर्माण झाली आहे. गावच्या अस्तित्वाची चिंता वाहणारे काही शिरगाववासीय या बेकायदा कराराला प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर आव्हान देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. खाण उद्योजकांच्या तालावर नाचणारे राज्य व केंद्र प्रशासन आणि त्यात खर्चीक न्यायव्यवस्था यातून हा गाव कसा वाचवायचा, असाच यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे.
यासंदर्भात प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शिरगाव कोमुनिदाद समितीने दोन बड्या खाण कंपन्यांकडे करार करून लाखो चौरसमीटर जागा पुढील २० वर्षांसाठी करारावर दिली आहे. एकूण ५० लाख रुपयांच्या बोलीवर केलेल्या या करारानुसार पाच लाख रुपये कोमुनिदादच्या नावे तर उर्वरित ४५ लाख रुपये सर्व गावकऱ्यांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कोमुनिदादच्या गावकऱ्यांची संख्या आता साडेतीनशे ते चारशेवर पोचली असून प्रत्येक गावकऱ्याला साडेअकरा हजार रुपयांचा हिस्सा मिळणार असल्याची माहिती एका ग्रामस्थाकडून मिळाली आहे.
सर्वे क्रमांक ६/०, ८४/० व ९३/० ही जागा एका खाण कंपनीला तर ८२/०, ८३/० व ८५/० ही दुसऱ्या कंपनीला देण्यात आली आहे. मुळात ही जागा कोमुनिदादची असूनही या सर्व सर्वे क्रमांकावर संबंधित खाण कंपनीचीच नावे लागली आहेत, अशी माहिती सुरेश गावकर यांनी दिली. सुरेश गावकर व अन्य गावकऱ्यांनी कोमुनिदादच्या या निर्णयाला जिल्हाधिकारी कार्यालय व उच्च न्यायालयातही आव्हान दिले असून त्याबाबत सुनावणी सुरू झाली आहे. कोमुनिदादला ही जागा करारावर व त्यात खाण उद्योगासाठी देता येत नाही पण केवळ ती जागा सदर खाण कंपन्यांच्या नावे लागल्याची संधी साधून हा करार करण्यात आला आहे, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. प्रत्येक गावकऱ्याच्या घरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सदस्याला या रकमेचा "जण' अर्थात लाभांश देण्याचा निर्णय कोमुनिदाद समितीने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे आपल्याच गावच्या अस्तित्वाच्या लिलावात प्रत्येकाला सामील करून घेण्याचाच कट आहे, असा ठपकाही तक्रारदारांनी ठेवला आहे.
खाण खात्याकडूनही परवानगी
दरम्यान, शिरगाव कोमुनिदाद समितीने केलेल्या कराराच्या वैधतेबाबत संशय निर्माण झाला असतानाच खाण खात्याकडून मात्र या जागेत खनिज उत्खनन करण्यास परवानगी देणारी अधिसूचना काल ११ रोजी जारी करण्याचा प्रकार घडला आहे. या कराराबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असताना खाण खात्याने कोणत्या आधारावर या जमिनीत खनिज उत्खनन करण्यास मान्यता दिली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. खाण खात्याच्या या परवानगीमुळे राज्य प्रशासन पूर्णपणे खाण उद्योजकांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे सिद्ध झाले आहे. आता केवळ न्यायदेवतेवरच विश्वास ठेवण्यापलीकडे अन्य कोणताच मार्ग राहिलेला नाही, असेही सुरेश गावकर म्हणाले.
श्री देवी लईराईच गावाला तारू शकेल?
राज्यात व राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित असलेल्या श्री देवी लईराईचा गाव म्हणून शिरगाव प्रसिद्ध आहे. मुळात श्री देवी लईराईच्या वास्तव्यामुळे या गावाला कीर्ती प्राप्त झाली आहे. श्री देवी लईराई मंदिराच्या कळसामागे रक्तबंबाळ अवस्थेतील शिरगावचे डोंगर पाहिले की येथील भयाण परिस्थितीचा अनुभव येतो. श्री लईराईच्या या प्रशस्त व टुमदार मंदिराच्या बांधकामासाठी येथील ग्रामस्थांनी खाण उद्योजकांची मदत घेतली खरी; परंतु हेच खाण उद्योजक हा गाव नामशेष करतील, याचा विचारही त्यांनी कदाचित त्यावेळी केला नसेल. शेती, बागायती, मासेमारी आदी व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शिरगावातील बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवण्यात आले. आपल्याच गावचे लचके तोडून त्यातूनच त्यांच्या पगाराची सोय करण्यात आली. "डिव्हाईड अँड रूल' या इंग्रजांच्या नीतीप्रमाणे खाण उद्योजकांनी आम्हा गावकऱ्यांत फूट घालून इथे आपला व्यवसाय वाढवला. आता आम्ही गावकरीच या गावच्या नायनाटाला कारणीभूत ठरणार आहोत, हे कुणीही विसरू नये, असे सांगत श्री देवी लईराईशिवाय या गावाला कुणीच तारू शकणार नाही, असे ते म्हणाले.
--------------------------------------------------------
धडाविना तडफडणारे शीर..
शिरगाव म्हणजे धडावेगळे झालेले तडफडणारे शीर अशीच सध्याची परिस्थिती आहे. खाण उद्योजकांनी चोहोबाजूंनी आक्रमण करून या गावाला जणू चक्रव्यूहात अडकवून सपासप वार करून या गावचे शीरच धडावेगळे केले आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली. हा गाव वाचवता येणे शक्य नाही का? असा सवाल करताच, "अहो! गाव वाचवायची गोष्ट काय करता? हा गाव कधीच मेला आहे. या मेलेल्या गावची परिस्थिती शवागारात ठेवलेल्या मृतदेहासारखीच बनली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की त्याची वासलात कशी लावावी?', असा प्रश्न उपस्थित करून एका ग्रामस्थाने सत्य परिस्थितीच सर्वांसमोर उभी केली.

No comments: