Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 8 November 2010

चीनकडून १९६२ ची पुनरावृत्ती अशक्य : लष्करप्रमुख

नवी दिल्ली, दि. ७ - सीमावर्ती भागात पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या चीनच्या हेतूबद्दल खात्रीलायकरित्या काहीही सांगणे शक्य नसले तरी, १९६२ ची पुनरावृत्ती अशक्य आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केले आहे.
या भागातली सुरक्षेची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, असे सांगतानाच पाक लष्कराची भारत केंद्रित भूमिका आणि अमेरिकेतर्फे दहशतवादच्या विरोधात लढण्यासाठी देण्यात येणाऱ्या मदतीचा पाकिस्तानकडून भारताविरूद्ध वापर होण्याची शक्यता या बाबी काळजी करण्यासारख्या आहेत. "चीन सीमावर्ती भागात पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या अनेक योजना राबवत आहे. स्थानिक जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना राबविण्यात येत असल्याचे चीनकडून सांगण्यात येत आहे. चीनकडून काहीही सांगण्यात येत असले तरी त्यांच्या हेतूबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत आणि एवढी क्षमता प्राप्त झाल्यानंतर चीनचा हेतू बदलला तर काहीही होऊ शकते आणि हीच अतिशय गंभीर बाब आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले आहे.
मात्र, काहीही झाले तरी १९६२ ची पुनरावृत्ती कदापि शक्य नाही, असे चीनने १९६२ मध्ये भारतीय भूमीवर केलेल्या आक्रमणाचा थेट उल्लेख न करता सिंग यांनी सांगितले. त्यावेळी सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य जमा झाले होते आणि चीनने भारताच्या काही प्रदेशावर आपला दावा केला होता. तशी परिस्थिती आज नाही. त्यामुळेच हे मी खात्रीलायकरित्या सांगू शकतो. १९६२ च्या तुलनेत परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. सीमेवरील स्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे, असी व्ही. के. सिंग यांनी सीएनएन-आयबीएन या वाहिनीवरील "डेव्हील्स ऍडव्होकेट' या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
या विभागातील सुरक्षेच्या परिस्थितीबाबत विचारले असता, ज्या देशाच्या सीमावर्ती भागात अस्थिरतेचे वातावरण आहे आणि ज्या देशांमधील सीमांची निश्चित आखणी झालेली नाही त्याठिकाणची सुरक्षेची स्थिती ही नाजूकच असणार आहे, असे सिंग यांनी पुढे सांगितले.

No comments: