Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 5 November 2010

आयटी हॅबिटॅट जाळपोळ प्रकरण

दोन वर्षांपूर्वीच चौकशी गुंडाळली
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): दोनापावला येथील राजीव गांधी "आयटी हॅबिटॅट" प्रकल्पावर हिंसक आंदोलकांनी हल्ला करून मोडतोड, जाळपोळ व तेथील कामगार तथा सुरक्षा रक्षकांना मारहाण करून सुमारे ५० लाख रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या घटनेची चौकशी पोलिसांनी पुराव्याअभावी गेल्या दोन वर्षांपूर्वीच बंद केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. पणजीचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ७ डिसेंबर २००७ रोजी ही घटना घडली होती व ४ ऑक्टोबर २००८ रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार पुराव्याअभावी या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली, असे ते म्हणाले.
तत्कालीन माहिती व तंत्रज्ञानमंत्री ऍड.दयानंद नार्वेकर यांनी १ नोव्हेंबर २०१० रोजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पत्र पाठवून दोनापावला येथील "आयटी हॅबिटॅट' च्या भवितव्याबाबत १५ दिवसांत ठोस निर्णय जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून याठिकाणी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची नासधूस कुणी केली याची पूर्ण माहिती मुख्यमंत्री कामत यांना आहे व तरीही याप्रकरणी कुणावरही गुन्हा किंवा आरोपपत्र दाखल होत नाही, असाही ठपका त्यांनी आपल्या पत्रात ठेवला होता. ७ डिसेंबर २००७ रोजी रात्री सुमारे शे दीडशेच्या जमावाने हातात लाठ्या - काठ्या, लोखंडी सळ्या, रॉड यांच्यासह "आयटी हॅबिटॅट'वर हल्लाबोल केला होता. प्रथम तेथील वॉचमनला धमकावून त्यांना मारहाण करण्यात आली व नंतर हातातील हत्यारांसह प्रचंड तोडफोड करून वाहनांना आगी लावण्यात आल्या होत्या.
याप्रकरणी दीडशे जणांवर पोलिसांनी तक्रार दाखल करून पोलिसांनी भा.दं.स. १४३, १४४, १४७, ४३५, ४२७ व सार्वजनिक मालमत्ता कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला होता. "आयटीजी' चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एम. आर. के. प्रसाद राव यांनी त्यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली होती. या जाळपोळ प्रकरणात सुमारे ५० लाख रुपयांची हानी झाल्याचे पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करणाऱ्या "एम.वेंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.ली' या कंपनीचे म्हणणे होते. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या मुख्य दरवाजावरील सिमेंटचे भव्य खांब "जेसीबी मशिन'च्या साहाय्याने पाडण्यात आले होते.
दोनापावला येथील या घटनेबाबत पोलिसांना एकही पुरावा न मिळणे व या प्रकरणाची फाईल बंद होणे हे "सेटिंग' असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. "आयटी हॅबिटॅट' च्या समर्थनार्थ मोर्चा काढलेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरील प्राणघातक हल्ला व "आयटी हॅबिटॅट' जाळपोळ प्रकरण या दोन्ही घटनांबाबत कॉंग्रेस पक्षातर्फे राजकीय सौदेबाजी करण्यात आली, असा आरोप खुद्द कॉंग्रेसचेच काही नेते करू लागले आहेत.
"आयटी हॅबिटॅट'विरोधी आंदोलनाचे नेतृत्व ताळगावचे आमदार तथा विद्यमान शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात करीत होते. बाबूश यांना कॉंग्रेसमध्ये दाखल करून बदल्यात त्यांच्याविरोधातील ही प्रकरणे बासनात गुंडाळण्याचा अलिखित करारच झाला असावा, असाही संशय युवक कॉंग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांनी "ए' फायनलाइज्ड म्हणून नोंद केले आहे. या प्रकरणाची "फाईल' नव्याने खुली करण्याची मोकळीक ठेवली असल्यामुळे या प्रकरणातील संशयितांवर हे प्रकरण टांगत्या तलवारीप्रमाणे लटकत राहणार आहे.

No comments: