Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 12 November 2010

चार्टर्ड विमानाला पक्ष्याची धडक; सर्व प्रवासी सुखरुप

वास्को, दि. ११ (प्रतिनिधी): पक्ष्याची धडक बसून तो पक्षी इंजिनमध्येच अडकल्यामुळे, दाबोळी विमानतळावरून २०८ पर्यटक प्रवाशांना घेऊन मॉस्कोला (रशिया) आज सकाळी ७.२५ च्या दरम्यान रवाना होणाऱ्या "एरोफ्लोट' या चार्टर्ड विमानाला रॅमानोव्ह व्लादिमीर नामक वैमानिकाने वेळीच ब्रेक लावले आणि सर्व प्रवासी सुखरुप बचावले. त्यांना ताबडतोब दुसऱ्या विमानाने मॉस्कोला पाठवण्यात आले.
वैमानिकाला वेळेवरच धोक्याची जाणीव झाल्याने त्याने धाव घेत असलेल्या विमानास ब्रेक लावल्याने पुढील धोका टाळला. उड्डाण घेण्यासाठी धावपट्टीवरून २०० किलोमीटर प्रतितास गतीने निघालेल्या सदर विमानाच्या डाव्या इंजिनावर पक्षी आदळला आणि तो त्यातच अडकला. त्यामुळे चाके "पंक्चर' होऊन विमानातून थोड्या प्रमाणात आग व धूरसुद्धा येण्यास सुरुवात झाली. सुदैवाने हा प्रकार तेवढ्यावरच निभावला.
सदर ठिकाणी चार अग्निशामक बंब त्वरित दाखल झाले. हे विमान लगेच धावपट्टीच्या बाहेर काढून ठेवण्यात आले. विमानाची बरीच हानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाबोळी विमानतळ क्षेत्रात गेल्या काही काळापासून पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विमानांना धोका निर्माण होऊ लागला आहे. यापूर्वीही असे प्रसंग उद्भवले होते.
"एरोफ्लोट' व्यवस्थापनाकडून शनिवारी हे विमान दुरुस्त करण्यासाठी खास पथक पाठवण्यात येणार आहे. तोपर्यंत सदर विमान दाबोळी विमानतळावर ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत खास बैठक बोलवून विमानतळाच्या क्षेत्रात कचरा घालण्याबाबत बंदी आणण्याचे कडक आदेश संबंधित पंचायतींना जारी केले. याबाबत कलमही लावण्याचे ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान आज घडलेल्या सदर प्रकाराबाबत गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले यांच्याशी संपर्क केला असता पक्षी विमानावर आदळणे ही गंभीर गोष्ट असल्याचे सांगून गोव्यात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने त्यांनी खेद व्यक्त केला.
गोवा सरकारबरोबर याबाबत आम्ही चर्चा करून ताबडतोब पावले उचलणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments: