रा. स्व. संघातर्फे पणजीत विराट धरणे; महिलांचा लक्षणीय सहभाग
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - हिंदूंची अवहेलना करणाऱ्या कॉंग्रेसचे दिवस आता भरले आहेत, असा खरमरीत इशारा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला. जेव्हा जेव्हा हिंदूंवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॉंग्रेसची कशी परिस्थिती झाली याची उजळणी कॉंग्रेसवाल्यांनी करावी. कॉंग्रेसकडून संघावर होणारे आरोप पेलण्याची ताकद संघाकडे आहे, मात्र याचा धडा कॉंग्रेसला नक्कीच मिळणार असल्याचे गोवा राज्य संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी संघटनेवर टीका करणाऱ्यांना ठणकावून सांगितले.
कॉंग्रेसने आरंभलेल्या हिंदूविरोधी अपप्रचाराच्या निषेधार्थ पणजी येथे आज दुपारी सुरू झालेल्या विशाल धरणे कार्यक्रमात श्री. वेलिंगकर बोलत होते. यात संपूर्ण गोव्यातून तीन हजार पेक्षा जास्त संघ कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सुरेश लोटलीकर, विरोधी पक्षाचे उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. दत्ता भी. नाईक, "भारत स्वाभिमान'चे डॉ. सूरज काणेकर, दक्षिण गोवा कार्यवाह रामदास सराफ, उत्तर गोवा कार्यवाह संजय वालावलकर, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहसेवा प्रमुख मधुकर दीक्षित, भारतीय स्त्री शक्तीच्या ऍड. स्वाती केरकर, अवधूत कामत, कांता पाटणेकर, शिरीष आमशेकर, प्रा. सुभाष साळकर व आनंदराव भावे असे मान्यवर उपस्थित होते.
"हम देश के अखंडता के लिये काम करेंगे,' असे बोलणाऱ्या श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करत सत्तेवर येण्यासाठी देश चीनला विकणाऱ्या कॉंग्रेसचे सत्य स्वरूप संपूर्ण देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मांडणार असल्याचे श्री.वेलिंगकर म्हणाले. काश्मिरीमध्ये देशप्रेम जागवणारे आणि देशभक्त असलेले मुस्लिमाचे संघटन करणाऱ्या इंद्रेशजी कुमार यांना खोट्या बॉंबस्फोट प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. देशात फुटीरतेची भाषा करणाऱ्या अरुंधती रॉय व गिलानी या देशद्रोह्यांवर गुन्हाही नोंद होत नाही आणि प्रखर राष्ट्रप्रेम रुजविणाऱ्या संघटनेच्या पदाअधिकाऱ्यांना दहशतवादी ठरवण्याचे काम कॉंग्रेस करीत आहे. संघ कार्यकर्त्यांच्या कत्तली करणारा आणि इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत सहा हजार शिखांची हत्याकांड करणारा कॉंग्रेस पक्ष हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी "भगवा दहशतवाद' असे नाव देऊन भारतात विष कालवत असल्याचा आरोप श्री. वेलिंगकर यांनी केला.
मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना कोणतेही पुरावे नसताना तुरुंगात डांबण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून मुंबई "एटीएस'ला पुरावे मिळत नाहीत. मात्र, कॉंग्रेसच्या आदेशावरून साध्वी प्रज्ञासिंह हिला तुरुंगात अश्लील चित्रपट दाखवले जातात. तिला मारहाण केली जात आहे. "एटीएस'ने तिचे हाल करून तिला कर्करोगाची रुग्ण करून सोडली असल्याचे ते पुढे म्हणाले.
राष्ट्रावर जेव्हा गंभीर प्रसंग येतो त्यावेळी कॉंग्रेसवाल्यांचे लक्ष केवळ रा. स्व. संघाकडेच जाते. हिंदू समाज प्रतिकार करीत नाही. त्यामुळे कॉंग्रेसकडून ही हिंदूंची बदनामी होत असल्याचे भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा म्हणाले. संघाला बदनाम करण्याच्या कारस्थानात अनेक संघटना गुंतल्या असून त्याच्या विरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. भारताचे भूभाग चीन गिळंकृत करीत आहे. देशात महागाई वाढली आहे. दहशतवाद, नक्षलवादाने थैमान घातले याकडे कॉंग्रेसचे लक्ष नसून संघाला बदनाम करण्यासाठीच ते धडपडत असल्याचेही श्री. डिसोझा यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्ष हा "फॅसिस्ट' आहे. धर्म आणि जातींत फूट पाडणारा हा पक्ष आहे.
या पक्षाला रामाच्या देशातून रोमला हाकलून लावले पाहिजे, असे दत्ता नाईक म्हणाले.
"राष्ट्रीय स्वयं सेवक संघ' असा स्वच्छ उच्चारही ज्याला धड करता येत नाही ते कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी संघावर टीका करतात हे हास्यास्पद आहे. संघासारख्या देशभक्त संघटनेला ही मंडळी दहशतवादी म्हणतात यासारखा विनोद नाही. १९७७साली याच देशात कॉंग्रेसने संपूर्ण भारताचे रूपांतर तुरुंग करून सरकारी दहशतवाद माजवला होता. या देशात बंदी घालण्यासाठी जर कोणती संघटना सर्वार्थाने योग्य असेल तर ती कॉंग्रेस असल्याचे उद्गार ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी काढले होते, याची आठवण श्री. नाईक यांनी करून दिली.
भारतीय स्त्री शक्तीच्या ऍड. स्वाती केरकर म्हणाल्या, येथे आलेल्या महिलांना बसमध्ये बसण्यासाठी कोणीही दीडशे रुपये दिलेले नाहीत. त्यांना पंढरपूर किंवा शिर्डी येथे घेऊन जाणाऱ्याचे आश्वासन दिलेले नाही. कॉंग्रेस पक्ष हिंदूविरोधी कारवाया करतो याची महिलांना झाल्याने या धरणे कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या
आहेत. कॉंग्रेसच्या राज्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी आमदार, मंत्र्यांसमोर फुगड्या घालाव्या लागतात,
संघावर टीका करणारे राहुल गांधी यांनी आधी या देशाचा इतिहास अभ्यासावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
तुमच्या मर्यादेत राहून सरकार चालवा असा सल्ला देत संघाची काठी तापली आणि सहनशक्ती संपली तर सर्वांनाच वठणीवर आणू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मधुकर दीक्षित यांनी दिला. या देशात वाईट प्रथा पसरवण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे, असेही ते म्हणाले.
या देशात भ्रष्टाचार कॉंग्रेसने आणला. दहशतवादाला खतपाणी घातले व अल्पसंख्याक, बहुसंख्याक अशी दुफळी माजवण्याचे काम कॉंग्रेसने केले. कॉंग्रेसने देशाला सोडाच आपल्या पक्षातील नव्या नेत्यांनाही पुढे येऊ दिले नाही. कॉंग्रेसने देशात केवळ अस्थिरताच आणली, असे सनसनाटी आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजायचा असेल तर संघात राहून काम केले पाहिजे. राष्ट्राला पूरक अशी ही संघटना आहे. संघाचा तर कोणी या देशात अपमान करीत असेल तर ते सहन केले जाणार असल्याचा इशारा भारत स्वाभिमन ट्रस्टचे डॉ. काणेकर यांनी दिला. संघाच्या आंदोलनाला भारत स्वाभिमानचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या धरणे कार्यक्रमात हजारो नागरिकांबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, अनंत शेट, महादेव नाईक तसेच, माजी आमदार विश्वास सतरकर, विनय तेंडुलकर, राजेंद्र आर्लेकर, ऍड. नरेंद्र सावईकर, डॉ.शाम भंडारे, कोकण प्रांत प्रचारक शरदराव खाडिलकर, कृष्णा पै आंगले असे अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
सूत्रसंचालन शिरीष आमशेकर व संजय वालावलकर यांनी केले. आभार अवधूत कामत यांनी मानले.
नेटके आयोजन
धरणे कार्यक्रमात राजधानीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसत होती. दुपारी ३ वाजल्यापासून नागरिक येण्यास सुरुवात झाली. धरणे धरलेल्या एका ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. रणरणत्या उन्हाचीही त्यांनी पर्वा केली नाही.
Thursday, 11 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment