Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 7 November 2010

जुनेगोवे येथे फॅक्टरीला भीषण आग

"फेबर कॅसल'ची सुमारे वीस कोटींची हानी झाल्याचा अंदाज

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- जुनेगोवे येथील खोर्ली औद्योगिक वसाहतीमधील "फेबर कॅसल, प्युमा स्टेशनरी ' या कारखान्याला आज भल्या पहाटे अचानकपणे लागलेल्या भीषण आगीत हा संपूर्ण कारखाना खाक झाला. अग्निशमन दलाच्या सुमारे ४० जवानांनी १० बंबांच्या साहाय्याने १२ तास अथक प्रयत्न करूनही ही आग आटोक्यात आली नाही. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नाही. तसेच या कारखान्याजवळच असलेली सदर कंपनीची जादा शेड वाचवण्यात अग्निशमन दल यशस्वी ठरले. या घटनेतील हानीचा अहवाल तयार करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा २० कोटी रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी अग्निशमन दलाचे अधिकारी डी.डी.रेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती सकाळी ६ वाजता जुनेगोवे अग्निशमन दल कार्यालयाला मिळाली. त्यानंतर तातडीने दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच आगीची तीव्रता पाहून त्यांनी लगेच उर्वरित केंद्रांना याची माहिती दिली. त्यामुळे राज्यभरातून एकूण दहा बंब व अतिरिक्त जवानांना पाचारण करण्यात आले.यावेळी सिजेंटा कंपनीकडूनही बंबांची सोय करण्यात आली. त्यांनीच याकामी पाण्याची सोय केली, अशी माहिती रेडकर यांनी दिली. या कारखान्यात प्रामुख्याने स्टेशनरी उत्पादन तयार केले जाते. तेथे फायबर व रबराचा साठा मोठा प्रमाणावर असल्याने आग मोठ्या प्रमाणात फैलावली. आगीचे लोट एवढे तीव्र होते की, त्यात सदर शेडचे वरील सिमेंटचे पत्रे व लोखंडी सळ्याही उंच ज्वाळांमुळे कोलमडून पडल्या. अग्निशमन दलासाठी ही घटना म्हणजे मोठे आव्हानच होते. सुमारे ४० अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सुमारे २४०० चौरसमीटर जागेत ही शेड उभारण्यात आली होती, असेही यावेळी ते म्हणाले.
या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अनुप राणे यांच्या म्हणण्यानुसार ही आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वीज खात्याकडे यासंबंधी चौकशी करण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे,असे ते म्हणाले. या दुर्घटनेतील हानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी तो सुमारे २० कोटी रुपयांच्या घरांत पोहचण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीचे तीव्र लोट
आगीचे लोट एवढे तीव्र होते की, त्यात सदर शेडचे वरील सिमेंटचे पत्रे व लोखंडी सळ्याही उंच ज्वाळांमुळे कोलमडून पडल्या. अग्निशमन दलासाठी ही घटना म्हणजे मोठे आव्हानच होते. सुमारे ४० अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.

No comments: