देशप्रेमी नागरिक समितीकडून कडाडून निषेध
पणजी, दि. ११ (प्रा. सुभाष वेलिंगकर): गोव्यात क्रूर पोर्तुगीज गुलामगिरीची पंचशताब्दी साजरी करण्याच्या पोर्तुगीजधार्जिण्यांच्या कुटिल कारस्थानाच्या पहिल्या अंकाची सुरुवात पोर्तुगिजांच्या "सांग्रेस' या जहाजाच्या गोव्यातील आगमनाने होत आहे, या गोष्टीचा कडाडून निषेध देशप्रेमी नागरिक समितीच्या जन-जागरण विभागाचा राज्य निमंत्रक या नात्याने मी करत आहे.
गोव्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांना या "पोर्तुगाली-सोहळ्या'विरूद्ध जोरकसपणे निषेध व विरोध संघटित करता येऊ नये म्हणून नौका-आगमनापूर्वी केवळ तीन दिवस अगोदर ही भेट जाहीर करून कौन्सुलादू जेराल द पोर्तुगाल डॉ. आंतोनियु कॉश्त यांनी आपला कावेबाजपणा सिद्ध केला आहे.
पोर्तुगीज साम्राज्याने ठिकठिकाणी गाजवलेल्या "शौर्य गाथेची' ५०० वर्षीय स्मृती जागृत करण्याचा उद्देश घेऊनच ही पोर्तुगालहून निघालेली शिडाची नौका स्वतंत्र भारतातील मुक्त गोव्यात येत आहे. ही पर्वणी साजरी करण्यात सहभागी होणे हा स्वातंत्र्यमूल्याचा धडधडीत अपमान असून आपल्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या (शौर्याचा नव्हे) क्रौर्याच्या गुलामगिरीचा उदोउदो आणि जयजयकार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभक्तांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी सांडलेल्या रक्तांचा अपमान आहे.
गोव्याच्या ५०० वर्षांच्या पोर्तुगीज गुलामगिरीचा "विकृत' महोत्सव साजरा करण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत व राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्ध यांनी सहभागी होऊन गोव्याच्या "स्वातंत्र्यमूल्यां'चा आणि स्वातंत्र्याकांक्षेचा अपमान करू नये अशी मागणी देशप्रेमी नागरिक समिती व समस्त देशप्रेमी, गोमंतकीयांच्या वतीने करण्यात येत आहे.
२५ नोव्हेंबर २०१० या दिवसापासून पोर्तुगीज - साम्राज्यवादी-गुलामगिरीची पंचशताब्दी साजरी करण्याचा पोर्तुगीज पिलाबळीचा निंद्य प्रयत्न राहणार आहे. सरकारने कोणत्याही प्रकारे गोव्याच्या स्वातंत्र्याचा अपमान करणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होऊ नये.
स्वातंत्र्यप्रेमी गोमंतकीय नागरिकांना एका मंचावर आणून अशा प्रकारच्या कलंकित पंचशताब्दी प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम देशप्रेमी नागरिक समिती निश्चितच करील. शांतताप्रेमी गोवेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, नाहीतर होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा फुंदासाव ओरिएंत, पोर्तुगीज कॉन्सुलेट व पोर्तुगाळलेली देशद्रोही पिलावळ यांना देशप्रेमी नागरिक समितीने दिला आहे.
Friday, 12 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment