Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 8 November 2010

अखेर जुझे यांनी सोडले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - वास्को पालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षातील नेत्यावर शेकडो समर्थकांसमवेत केलेला हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महागात पडला असून अखेर जुझे फिलिप डिसोझा यांना आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
जुझे हे विद्यमान सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आज दुपारी फॅक्सद्वारे पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नावे राजीनामा पाठवून दिला. "मी आज फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला असून त्यात आपण राजीनाम्यामागचे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही,' असे श्री. डिसोझा यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीला दोन दिवस असताना जुझे यांच्या समर्थकांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मिकी पाशेको याच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मिकी हे आपल्या समर्थक उमेदवाऱ्यांविरोधात मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करून त्याविरोधात जुझे यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रारही नोंद केली होती. तथापि, मिकी यांनी हे आरोप फेटाळून आपण तेथील एका हॉटेलमध्ये जेवायला आले होतो. त्यावेळी जुझेच्या समर्थकांनी आपणावर हल्ला चढवून वाहनाची नासधूस केल्याचे म्हटले होते. तसेच दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी पोलिस तक्रारही नोंद केल्या होत्या.
पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेऊन गोव्याचे प्रभारी प्रकाश बिनसाळे यांना या प्रकरणाचा मागोसा घेऊन अहवाल सादर करण्यासाठी गेल्या आठवड्यात गोव्यात पाठवले होते. या चौकशीचा अहवाल सादर करण्याच्या एका दिवसापूर्वीच जुझे डिसोझा यांनी आज राजीनामा सादर केला. त्यामुळे यासंदर्भात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मिकी पाशेको यांनी यापूर्वीच बिनसाळे यांच्यासमोर आपण प्रदेशाध्यक्ष बनवण्यास तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार याच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून आपली बाजू भक्कम केली आहे. त्यामुळे आता गोव्यात प्रदेशाध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रदेशाध्यक्षपद आपल्याच गळ्यात पडावे यासाठी पक्षातील काही नेत्यांनी जोरदार "लॉबिंग' करण्यांसही सुरुवात केली आहे. नुकतीच या विषयीची एका बैठकीही प्रफुल्ल हेदे यांच्या अध्यक्षते खाली झाली असून त्यात अनेकांची नावे पुढे आली आहेत. यात निर्मला सावंत, सुरेश परुळेकर तसेच, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जितेंद्र देशप्रभू यांनीही अध्यक्षपदासाठी रुची दाखवली आहे.

No comments: