Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 9 November 2010

"इफ्फी'आयोजन घोळामुळे मुख्यमंत्री झाले चिंताग्रस्त

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - "इफ्फी' महोत्सवाला आता मोजकेच दिवस बाकी असताना राज्य सरकारची तयारी मात्र काहीच झालेली नसल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत चिंताक्रांत बनले आहेत.आज त्यांनी समन्वय समितीची तातडीची बैठक बोलावून "इफ्फी'आयोजनाच्या कामाचा आढावा घेतला.
एकीकडे अद्याप एकाही निविदेवर निर्णय झाला नसताना आयोजनाची जबाबदारी दिलेले सदस्य विदेशी दौऱ्यांत मश्गूल आहेत तर काही सदस्य विदेश दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत,अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यंदाच्या "इफ्फी'आयोजनाचा घोळच सुरू असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अत्यंत विश्वासाने नेमलेले काही सदस्य या महोत्सवातून आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच प्रयत्नरत असल्याने हा त्यांच्यासाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे.गोवा मनोरंजन संस्थेच्या एका सदस्यावर मेहरनजर करण्यासाठी महोत्सव हॉटेलच्याबाबतीत "बीच रिसॉर्ट' ची लादलेली अट राज्य सरकारच्या चांगलीच अंगलट आली आहे. ही अट रद्द करण्यास केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने स्पष्ट नकार दिला आहे. आता सदर हॉटेल उद्योजक सदस्याने आपली कात वाचवण्यासाठी हॉटेल निविदेत भाग घेतला नाही व बीच हॉटेल मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ सरकारवर ओढवली आहे. "इफ्फी' महोत्सव रंगमंच तथा इतर आयोजन निविदेवरून दोन मंत्र्यांत चांगलीच जुंपल्याने या निविदेवरही अंतिम निर्णय होत नाही. विविध कंत्राटदार गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यालयात हेलपाटे मारीत असून त्यांना काहीबाही कारणे सांगून पाठवले जात असल्याचीही खबर आहे.
मडगाव रवींद्र भवन अपात्र
यंदाच्या इफ्फीचा उद्घाटन किंवा समारोप सोहळा मडगाव येथील रवींद्र भवनात आयोजित करण्याचा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा बेत सपशेल फोल ठरला.ए.के.बीर यांच्या अध्यक्षतेखालील "डीएफएफ' ने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने रवींद्र भवनाला हे कार्यक्रम आयोजित करण्यास अपात्र ठरवले आहे,अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मडगावातील रवींद्र भवनाला पडलेले तडे व येथील प्रसाधनव्यवस्था गचाळ असल्याचेही या समितीने आपल्या अहवालात नमूद केल्याची चर्चा सुरू आहे.

No comments: