पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मिकी पाशेको व जुझे फिलिप डिसोझा यांच्यातील या सुंदोपसुंदीची संधी साधून राष्ट्रवादी पक्षाला सुरुंग लावण्याची व्यूहरचना कॉंग्रेसकडून आखली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
नगरपालिका निवडणूक प्रचारात माजी पर्यटनमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको हे आपल्याविरोधात मतदारांना फूस लावत असल्याच्या कारणावरून महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी त्यांच्याशी घेतलेला पंगा सध्या कॉंग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. जुझे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्षाची जबाबदारी झटकली असली तरी त्यांच्या या कृतीमागे दक्षिण गोव्यातील काही बड्या कॉंग्रेस नेत्यांचा हात असल्याचे जाहीरपणे बोलले जाऊ लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर आपला दावा करण्यासाठी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांत जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे. डॉ.कार्मो पेगादो, प्रा.सुरेंद्र सिरसाट, पांडुरंग राऊत, संगीता परब व जितेंद्र देशप्रभू यांची नावे या पदासाठी विचारात असली तरी डॉ.प्रफुल्ल हेदे यांच्याकडेच हे पद देण्यात यावे, यासाठीही एक गट कार्यरत आहे.
दरम्यान, संगीता परब यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद बहाल करून महिलांना पक्षाकडे आकर्षित करणे शक्य आहे. त्याचा उपयोग येत्या विधानसभा निवडणुकीत होईल,असा होरा काहीजणांनी काढून त्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहेत,अशीही चर्चा आहे.कॉंग्रेस पक्षातील शेकडो युवा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्याचा कार्यक्रम आयोजित करून जितेंद्र देशप्रभू यांनीही श्रेष्ठींसमोर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे येत्या काळात या नेत्यांत या पदासाठी एकमेकांवर कुरघोडीचेही प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
मुदतपूर्व निवडणुकीची तयारी?
राज्यात मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा विचारप्रवाह कॉंग्रेस अंतर्गत एका गटाकडून सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. पुढील वर्षी मे महिन्याच्या काळात निवडणुका घेता येतील, या दिशेने विचारविनिमय सुरू झाल्याचे कळते. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मुदतपूर्व निवडणुकीसाठी अजिबात राजी नाहीत; परंतु कॉंग्रेस पक्षांतर्गत काही नेत्यांनी आपली वैयक्तिक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने चालवलेली धडपड पाहता ती रोखण्यासाठी मुदतपूर्व निवडणुकीचाच पर्याय राहतो, असे ठाम मत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, उत्तरेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे दबावतंत्र व दक्षिणेत आलेमाव बंधूंंकडून आपली ताकद वाढवण्याचे चालवलेले प्रयत्न यामुळे कॉंग्रेस संघटनेतही अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. हे सगळे प्रयत्न कॉंग्रेसची ताकद वाढवण्यासाठीच सुरू असल्याचे जरी वरवर दाखवले जात असले तरी तो पक्षासाठी घातक ठरण्याचीच जास्त शक्यता आहे, असाही अनेकांचा सूर आहे.
Tuesday, 9 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment