Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 12 November 2010

'सांग्रेस' जहाजाला गोव्यात थाराच नको

गोमंतकीय युवा मंचही खवळला
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): पोर्तुगालच्या शौर्याची पाचशे वर्षे साजरी करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या "सांग्रेस' या पोर्तुगालच्या जहाजाला गोव्याच्या बंदरात नांगर टाकण्याची अनुमती अजिबात देऊ नये, अशी आग्रही मागणी गोवा युवा मंचाने केली असून याविषयीचे एक निवेदन आज कॅप्टन ऑफ पोर्टस् यांना देण्यात आले.
गोवा मुक्तिलढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करून असा
कार्यक्रम राज्य सरकारने गोव्यात आयोजिल्यास गोमंतकातील तरुण रस्त्यावर उतरून रक्तही सांडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा झणझणीत इशारा मंचचे निमंत्रक ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी दिला.
यावेळी कॅप्टन ऑफ पोर्टचे कॅप्टन श्री. ब्रागांझा दुपारी १२.३० पर्यंत आपल्या कार्यालयात आले नसल्याने अखेर तेथील अधिकाऱ्यांना मंचतर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाची एक प्रत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गोव्यातील नौदल प्रमुखांनाही पाठवण्यात आली आहे. यावेळी अनेक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोमंतकीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पोर्तुगालच्या सरकारने गोव्यात आयोजिलेल्या या कार्यक्रमामुळे गोमंतकीय युवक खवळले आहेत. तसेच
स्वातंत्र्यसैनिकांनीही निषेधाचा धडाका लावला आहे. त्यामुळे राज्य सरकारला प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच पोर्तुगाली राजवटीने गोव्याच्या जनतेवर पाशवी अत्याचार केले होते. धर्मांतराचे निच काम त्यांनी गोव्यात सुरू केले आणि महिलांवरही अत्याचार केले. त्याच पोर्तुगिजांच्या सरकारला आपल्या राजवटीची पाचशे वर्षे गोव्यात येऊन साजरी करायला गोवा सरकारने परवानगी देणे हा कमालीचा संतापजनक प्रकार असल्याचे श्री. फळदेसाई म्हणाले.
राज्य सरकारने अत्यंत गुप्तता पाळून या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे, अशी आमची माहिती आहे. तसेच, गोव्यात दाखल होणाऱ्या या पोर्तुगालच्या अधिकाऱ्यांना मेजवानी देण्याचाही घाट सरकारने घातला आहे. त्याबद्दल कॉंग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला. हे असले प्रकार मंचातर्फे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मंचचे सचिव ह्रदयनाथ शिरोडकर यांनी दिला आहे.

No comments: