डॉ. शेखर साळकर यांचे आज पन्नासाव्या वर्षात पदार्पण
ज्योती धोंड
राजकीय, साहित्य, नाट्य, सामाजिक चळवळी अशा विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे व्यक्तिमत्त्व कोण, असा प्रश्न विचारला तर आपल्याला झटकन आचार्य अत्रे किंवा पु. ल. देशपांडे ही नावे आठवतात. आजार म्हटले की डॉक्टरची आठवण येते. त्या अनुषंगाने "आजार सरो वैद्य मरो' अशी म्हणही ऐकिवात आहे. अर्थात, अशा म्हणींना थेट फाटा देणारे एक नामवंत शल्यविशारद म्हणजे भतग्राम नगरीचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. शेखर शिवराम साळकर. आज ते वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहेत. या डॉक्टरांचा रुग्णांना इतका लळा की, आजार दूर झाला तरी डॉक्टरांशी निर्माण झालेले अकृत्रिम जिव्हाळ्याचे नाते काही संपत नाही ! त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळले की, ते कायमचे म्हणून समजायचे. मग आजार असो किंवा नसो. गगनभरारी घेऊन एखादे पाखरू जसे पुन्हा आपल्या इवल्याशा घरट्यात मायेची ऊब लेवून विसावते, अगदी तसाच उच्चशिक्षित कर्करोग शल्यविशारद डॉ. साळकर यांचा सारा जीवनपट. डिचोलीसारख्या खेडेगावात ५० वर्षांपूर्वी जन्मलेले, खेड्यात राहूनही उच्च शिक्षण, संस्कार आणि कीर्ती प्राप्त झालेले डॉ. साळकर यांना आपल्या भतग्रामनगरीविषयी कमालीचा अभिमान.
या ना त्या निमित्ताने जगभर प्रवास करणारे हे डॉक्टरमहाशय डिचोलीला उद्देशून अगदी थाटात सांगतात, "भतग्राम हेच माझे पंढरपूर'.
निष्णात शल्यविशारद अशी दिगंत कीर्ती देशविदेशात प्राप्त केलेले डॉ. साळकर म्हणजे जणू इंद्रधनुषी व्यक्तिमत्त्वच. सामाजिक बांधीलकी जपणारी संवेदनशील व्यक्ती म्हणून ते विलक्षण लोकप्रिय आहेत. त्यांनी जोर लावून धरलेल्या "तंबाखू सेवनविरोधी' मोहिमेला तर सिनेतारकही वचकून असतात. डॉ. शरद वैद्यांकडून त्यांनी कर्करोग जागृती आणि निर्मूलनाचा वारसा स्वीकारला. हा वारसा ते आजतागायत धडाक्याने राबवत आहेत. कर्करोगाशी त्यांचा कळतनकळत पहिला संबंध आला तो ते बारावीत शिक्षण घेत असताना. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांच्या मातोश्री नीरा या कर्करोगाला बळी पडल्या. त्याचवेळी साळकरांनी कर्करोग शल्यविशारद होण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. त्या अगोदर ते "क्रिकेटर' होण्याची स्वप्ने पाहात होते. एवढेच नव्हे तर त्यांनी २२ वर्षांखालील सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत महंमद अझरुद्दीनच्या हैदराबाद संघाविरुद्ध शतकही ठोकले होते. वैद्यक क्षेत्रात पाऊल ठेवल्यावरही त्यांनी "गोमॅकॉ'चे प्रतिनिधित्व करताना खणखणीत द्विशतक ठोकले होते. दक्षिण विभागासाठी यांची निवडही झाली होती, पण त्यावेळी वैद्यकीय शिक्षण सुरू असल्याने त्यांनी क्रिकेटला जड मनाने आपली बॅट "म्यॅन' केली. आपण क्रिकेटर बनू शकलो नाही ही बोचरी जाणीव आजही त्यांना सतावते.
"गोमॅकॉ'तून "एमबीबीएस'ची पदवी प्राप्त केल्यानंतरचा वैद्यकीय प्रवास साळकरांनी मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळातून प्रख्यात डॉक्टर प्रफुल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली केला. त्यांनाच ते आपले गुरुवर्य मानतात. ऑन्कोलॉजीमध्ये "एमएस' पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. साळकरांना वेध लागले ते गोव्याचे. अगदी डिचोलीतून त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. "अनेक डॉक्टर गोव्यात शिकून बाहेरगावी जम बसवितात; पण मी मात्र बाहेर शिकून डिचोलीत परत आलो. आज गोव्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण मला डिचोलीत शोधत येतात याचा मला रास्त अभिमान वाटतो', असे डॉ. साळकर सांगतात. पणजीत पाऊल टाकल्यानंतर, ते कर्करोगातील शल्यविशारद म्हणून त्यांच्यावर नितांत विश्वास ठेवणारे त्यांचे डॉक्टर स्नेही डॉ. प्रमोद तळावलीकर, डॉ. श्याम भांडारे आणि डॉ. प्रमोद धुंगट यांच्याविषयी डॉ. साळकरांना अत्यंत आदर आहे. "मी आज जो काही आहे तो या माझ्या मित्रांमुळेच' असे ते अभिमानाने सांगतात.
डॉक्टर साळकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव स्वप्निल, कन्या सोनाल आणि धर्मपत्नी मेधा यांना चित्रपटांचे भारी वेड. दिवसाला लागोपाठ तीन तीन चित्रपट पाहण्याचा विक्रम या सर्वांनी केला आहे! त्यांचा डॉक्टर सुपुत्र स्वप्निल तर " बाप से बेटा सवाई'.
लागोपाठ एकाच थिएटरात चार वेगवेगळे सिनेमा पाहायचा विक्रम या सुपुत्राने केला आहे. आपल्या रुग्णांची खूप काळजी घेणारे, त्यांच्या जखमाच नव्हे तर मनेही सांभाळणारे "हॅपी गो लकी' डॉक्टर म्हणून ते परिचित आहेत. गोव्याच्या राजकारणात त्यांना मर्यादित रस आहे तो माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकरांसारख्या तळमळीच्या राजकीय नेत्यांमुळे, असे ते सांगतात. ज्या समाजाने आपल्याला घडविले त्या समाजाचे आपण ऋण लागतो या भावनेने ते आपल्या पेशाशी समरस झाले आहेत. शेकडो लोकांवर विनाशुल्क उपचार करणे, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक जखमांवर फुंकर घालणे हे डॉ. साळकर आपले परमकर्तव्य समजतात.
आपले वडीलबंधू वल्लभ साळकर यांचे मार्गदर्शन त्यांच्या जीवनात मोलाचे आहे, याचा ते आवर्जून उल्लेख करतात. आज आपले हे वैभव आणि कीर्ती पाहायला आपली आई जवळ नाही याचे दुःख डॉक्टरांच्या डोळ्यात आजही स्पष्ट दिसते. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांना ज्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागते त्यांच्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिण्याचा मनोदयही डॉ. साळकरांनी यावेळी व्यक्त केला. ते सांगतात की, नेहमीच कॅन्सरग्रस्तांना आपण जीवदान देऊ शकत नाही. तथापि, त्यांच्या यातना कमी करू शकतो याचेच समाधान वाटते, असे त्यांनी बोलून दाखवले.
एक उमदे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, ज्यांच्यासमवेत काही क्षण हास्यविनोद केले तरी आपणाला प्रचंड उत्साह मिळतो अशा डॉ. साळकरांना पन्नासाव्या वाढदिनी आमच्या लाख लाखशुभेच्छा...
Tuesday, 9 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment