Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 18 January 2009

क्रांतिकारकांची उपेक्षा खेदजनक

सच्चिदानंद शेवडे यांचे प्रतिपादन

"स्वातंत्र्याची समरगाथा' व्याख्यानमालेचे चौथे पुष्प

पणजी, दि. १७ - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांबद्दल आपल्या देशामध्ये प्रचंड अनास्था व बेफिकीरी असल्यामुळे "शिवराम हरी ब्रह्मे(राजगुरूंसारख्या) "शापादपि शरदपि' अशी योग्यता असणारा वीर आजही दुर्लक्षित राहिला, अशी खंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केली. भारत विकास परिषद व जनहित मंडळ पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "स्वातंत्र्याची समरगाथा' या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
पुण्याजवळील खेड येथे जन्मलेले शिवराम हरी राजगुरू हे अचूक लक्ष्यभेदी व संस्कृतचे पंडित होते. बाबाराव सावरकरांच्या सूचनेनुसार हसन निजामदेच्या सासऱ्याला त्यांनी टिपले, सॅंडर्सला एकाच गोळीत उडवले. राजगुरूंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. खरे तर यानिमित्ताने भारत सरकारला टपाल तिकिट काढता आले असते पण तितकेही औदार्य दाखवून त्यांच्या कार्याची दखल घ्यावी असे सरकारला वाटू नये याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
भगतसिंह, राजगुरू सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला एक वेगळे वळण प्राप्त झाले. पंजाब, महाराष्ट्र, बंगाल या ठिकाणी सशस्त्र क्रांती झाली. भारतीय स्वातंत्र्य युद्धात प्रत्यक्ष सहभाग नसताना भगतसिंहाचे (कम्युनिझमशी) साम्यवादी नाते जोडून त्याचे श्रेय आयते बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गांधी-आयर्विन कराराच्या पार्श्वभूमीवर भगतसिंह, राजगुरू,सुखदेव या राजबंद्यांना ब्रिटिश सरकारने मुक्त करावे याकरिता सर्व मतभेद विसरून बाबाराव सावरकर गांधीजींकडे गेले.गांधीजींनी या क्रांतिकारकांना सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, इंग्रजांना त्यांनी गळ घालावी अशी विनवणी केली. परंतु पुढाकार तर सोडाच परंतु त्यांच्या फाशीनंतर लगेचच झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचे सौजन्यही गांधीजींनी दाखविले नाही. हा आपला खरा इतिहास आहे.
भगतसिंह, राजगुरू, सुखदेव हे क्रांतिकारक पकडले गेल्यानंतर त्यांनी अन्नत्याग सुरू केला. याचवेळी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवरच गोळ्या झाडून घेऊन स्वातंत्र्ययज्ञात आहुती दिली. अशा या थोर क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने अत्यंत क्रूर वागणूक दिली.मृत्यूसमयीही त्यांच्या यातना संपल्या नाहीत.
जतिंद्रांचे हौतात्म्य, भगतसिंहाचे व आझादांचे कार्य, राजगुरुंवरील अत्याचार आणि सर्वसामान्यांना अज्ञात असणारा त्यांचा जीवनपट उलगडून दाखवत असताना रसिकांचे डोळे पाणावले.
डॉ. शेवडे यांचे घणाघाती वक्तृत्व,मार्मिक शैली, आणि अभ्यासपूर्ण विषय मांडण्याची हातोटी यामुळे श्रोत्यांवर जबरदस्त मोहिनी पडली. वास्तविक अशा प्रकारचे कार्यक्रम तरुण वर्गासाठी आयोजित केल्यास या कार्यक्रमांचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
आजच्या व्याख्यानमालेची सुरुवात कु. चैताली गावस हिने गायिलेल्या संपूर्ण "वंदे मातरम्' ने झाली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून "गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई उपस्थित होते. त्यांचा परिचय डॉ. भिवा मळीक यांनी करून दिला. श्री. देसाई यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषदेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, जनहित मंडळाचे अध्यक्ष भिवा मळीक व प्रमुख वक्ते सच्चिदानंद शेवडे उपस्थित होते.
यावेळी धनश्री देवारी हिने "वेदमंत्राहूनी आम्हा वंद्य वन्दे मातरम् हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सौम्या सराफ हिने केले. कार्यक्रमाची सांगता शांतिमंत्राने झाली.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys