Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 22 January 2009

'सम्राट'चे थाटात जलावतरण संरक्षण व्यवस्था भक्कम करणार : अँटनी


संरक्षण मंत्री ए. के.अँटनी यांच्या हस्ते वास्को येथे 'सम्राट' या गस्तीनौकेचे बुधवारी थाटात जलावतरण करण्यात आले. त्याप्रसंगी संरक्षण उत्पादन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग, किनारारक्षक दलाचे महानिरीक्षक राजेंद्र सिंग, सम्राट गस्तीनौकेचे प्रमुख विजय चाफेकर, गोवा शिपर्याडचे प्रमुख ए.के हंडा, संरक्षण खात्याचे सचिव प्रदीप कुमार व अन्य मान्यवर. (छाया ः पंकज शेट्ये)

वास्को, दि.२१ (प्रतिनिधी): किनारपट्ट्यांच्या सुरक्षेबरोबरच देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी लष्कराला सर्व साधनसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी निःसंदिग्ध ग्वाही संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी आज येथे दिली.
गोवा शिपर्याडने किनारारक्षक दलासाठी बांधलेल्या "आय.सी.जी.एस सम्राट' या सहाव्या अत्याधुनिक गस्तीनौकेच्या जलावतरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.यावेळी संरक्षण उत्पादन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग, किनारारक्षक दलाचे महानिरीक्षक राजेंद्र सिंग, गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी संजय वडगावकर, गोवा शिपर्याडचे प्रमुख ए.के हंडा, संरक्षण सचिव प्रदीप कुमार, गोव्याचे महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या गस्ती नौकेच्या जलावतरणानंतर किनारारक्षक दलाकडील गस्तीनौकांचा एकूण संख्या ७४ झाली आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणांनी अहोरात्र सज्ज राहावे. गोवा शिपयार्डने याकामी बजावलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. यापुढेही ते देशाला अशीच सेवा देतील यात शंका नाही, असे श्री. अँटनी म्हणाले.
आधुनिक यंत्रणांनी सज्ज अशी गोवा शिपर्याडने बनवलेली ही सर्वांत मोठी गस्तीनौका असल्याने आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा. सध्या ओमानच्या शाही नौदलासाठी खास जहाज बांधण्याचे काम शिपयार्डतर्फे सुरू असल्याची माहिती श्री. हंडा यांनी दिली.
यानंतर श्री. अँटनी यांच्या हस्ते "सम्राट' गस्तीनौकेचे जलावतरण करण्यात आले. मग या नौकेचा ताबा किनारारक्षक दलाचे उपमहानिरीक्षक विजय चाफेकर यांच्याकडे देण्यात आला. १०५ मीटर लांबी असलेल्या या नौकेवर श्री चाफेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ अधिकाऱ्याबरोबर ९४ किनारारक्षक जवान किनारपट्टीवर नजर ठेवणार आहेत. मुंबईमध्ये या गस्तीनौकेचा मुक्काम असणार असून "सी किंग' व "चेतक'सारखी हेलिकॉप्टर तिच्यावर आपली कामगिरी बजावू शकतात. सम्राट गस्ती नौकेवर दोन ३० एमएम "सी आर एन ९१'(बंदुका) व दोन १२.७ एमएम "प्रहार' (मशीन गन) बसविण्यात आल्या आहेत.

No comments: