इस्लामाबाद, दि. २२ : दहशतवादाचा नायनाट करण्याऐवजी पाकिस्तानने अमेरिका आणि भारताशी उघड संघर्षाची भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी, दहशतवाद्यांवर कारवाई करा नाहीतर लष्करी मदत थांबवू असा इशारा दिल्यानंतर पाकने आक्रमक पवित्रा घेऊन चीनची मदत घेण्याचे संकेत उघडपणे दिले आहेत.
मुंबई हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी भारताकडून आणि तालिबान, अल-कायदाचा खातमा करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव येत असल्यामुळे पाकने चीनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला इशारा देणे सोडा , तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील असे प्रत्युत्तर देणाऱ्या पाकिस्तानने गुरुवारी आणखी पुढे जात २६-११ च्या हल्ल्यासंदर्भात आमची वकिली चीन करेल असे सांगून टाकले आहे!
भारताशी २६-११ च्या विषयावर पाकिस्तानच्यावतीने चीन चर्चा करेल, अशी घोषणाच पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आशियाई उपखंडातील राजकारणाचे सारे संदर्भच बदलणार आहेत. पाकची ताजी घोषणा हे त्याचेच द्योतक असल्याचे मानले जात आहे. हे याफेई या चिनी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एका पथकाची नेमणूक करण्यात येणार असून तेच भारताशी बोलणार असल्याचे कुरेशी म्हणाले.
चिनी पथकाशी पाक सरकारने चर्चा केली असून आमची भूमिका त्यांना सांगितली आहे, असेही कुरेशी यांनी सांगितले. भारताशी होणा-या चर्चेची माहिती वेळोवेळी हेच पथक पाक सरकारला देईल असेही त्यांनी सांगितले. पाकचे चिनी वकील लवकरच पाकिस्तान भेटीवर येणार असून त्यांच्याशी भारताशी करायच्या चर्चेबाबत पुन्हा एकदा सविस्तर बोलणार असल्याचेही कुरेशी म्हणाले. भारताशी असलेला तणाव दूर करण्यासाठी चिनी वकिलाची नेमणूक केल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पाकिस्तानने स्वीकारलेल्या चिनी वकिलीबाबत भारत सरकारने अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment