पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) : जागतिक तापमान दिवसेंदिवस वाढत चालल्याने मानवजातील त्याचे गंभीर परिणाम सोसावे लागत आहेत. म्हणून यासंदर्भात जागृती करून तरुणांना सौरऊर्जा वापरण्यास प्रेरित करण्यासाठी "इंडियन युथ क्लायमेट नेटवर्क'ने आयोजिलेली "इंडियन क्लायमेट सोल्युशन्स रोड टूर' आज गोव्यात दाखल झाली. बंगळूर येथून सुरू झालेली ही यात्रा साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करून ४ फेब्रुवारी ०९ रोजी दिल्लीत दाखल होणार आहे.
बॅटरीवर चालणारे "रेव्ह' वाहन घेऊन ही यात्रा सुरू असून या वाहनातून प्रवास करणाऱ्या तरुणांनी आज म्हापसा येथील सेट झेव्हीयर महाविद्यालयाच्या व आल्तिनो येथील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
त्याचप्रमाणे या संघटनेतर्फे सायंकाळी कला अकादमीच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "देशातील तरुणांना तापमान बदलाची माहिती आहे. आता यासंदर्भात कृती करण्याची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत, त्यांची माहिती बाकीच्यांना द्यावी व प्रत्यक्ष कार्यवाहीत आणावेत, असे क्लायमेट सोल्युशन प्रकल्पाच्या समन्वयक कॅरोलिन होवे यांनी सांगितले. पर्यावरण जपण्यासाठी व तशी दृष्टी देण्यासाठी भविष्यातील तरुण नेत्यांना सामावून घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान हे तरुण स्थानिक तरुणांचे जाळे तयार करतील आणि त्या तरुणांनी त्यांच्या पातळीवर त्यांचे प्रकल्प सुरू करावेत, असे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
"क्लायमेट सोल्युशन रोड टूर' हा भारतीय तरुणांनी अशा प्रकारे तयार केलेला पहिलाच उपक्रम आहे. तो सकारात्मक, एकत्रित प्रयत्न असून पुढील काळात अभिमान वाटावा असे भविष्य निर्माण करण्याचा तो एक प्रयत्न आहे. हा रोड टूर "आयवायसीएन' तर्फे सुरू होणाऱ्या पर्यावरण उपाय प्रकल्पाची सुरुवात असून, त्यात भारतातील पर्यावरणविषयी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि त्याचे "डॉक्युमेंटेशन' करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
ही यात्रा दि. ३ जानेवारी ०९ रोजी बंगळूर येथून सुरू झाली असून हैदराबाद, पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर असा प्रवास करीत दिल्ली गाठणार आहेत. या यात्रेत त्यांनी प्रदूषण न करणाऱ्या वाहनांचाच प्रामुख्याने उपयोग केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment