Thursday, 22 January 2009
ओबामांची पाकला तंबी दहशतवाद रोखा, अन्यथा आर्थिक मदत बंद
वॉशिंग्टन, दि. २१ पाकिस्तानने अतिरेकी कारवायांविरुद्ध कडक धोरण अवलंबले नाही तर यापुढे पाकला आर्थिक मदत मिळणार नाही, असा सज्जड दम अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओबामा यांच्या प्रशासननाने दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारची पाचावर धारण बसली असून तेथील सरकार दहशतवादाबाबत कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
कालच ओबामा यांनी नवे राष्ट्राध्यक्ष या नात्याने शपथ घेतली व आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या दृष्टीने ही बाब विलक्षण दिलासादायी ठरली आहे. दहशतवादाचा धोका साऱ्या जगाला व्यापून राहिला आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेसह युरोपीय देशांनाही हा धोका भेडसावू लागला आहे. आपल्या प्रचाराच्या काळात दहशतवाद निपटून काढण्याचे अभिवचन ओबामा यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी पाकला दिलेला हा इशारा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पाकला येत्या पाच वर्षांत सध्याच्या मदतीत तिप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. ही मदत सुमारे सातशे बिलीयन डॉलर्स इतकी आहे. तिचा वापर प्रामुख्याने शाळा बांधणे, रस्ते आणि आरोग्य सेवा सुधारणे इत्यादी विकास कामांसाठीच करायची अट अमेरिकेच्या सरकारने घातली आहे.
अमेरिकन सरकारने पाकिस्तानला असेही सुनावले आहे की, अफगाणिस्तानमध्ये अल कायदा करत असलेल्या कारवायांसाठी पाक आपल्या भूमिचा वापर करू देत आहे. याचा फटका अमेरिकेला बसतो आहे, कारण सध्या अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहे.
शिवाय पाक सरकारने पाकिस्तानमधील राजकीय आणि न्यायालयीन कारभारात हस्तक्षेप करू नये अशी अटही अमेरिकेने पाक राज्यर्कत्यांना घातली आहे. ही शर्त महत्त्वाची आहे कारण पाकमधील लष्करी असो किंवा लोकशाही मार्गाने सत्तेत आलेली असो, पाक लष्कराच्या दडपणाखाली तेथे अशी ढवळाढवळ केली जाते असे आढळून आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment