Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 18 January 2009

कचरा समस्या बिकट

पणजीचे विद्रुपीकरण, सर्वत्र दुर्गंधी


पणजी,दि.१७(प्रतिनिधी)- पणजी शहरातील हॉटेलांचा कचरा उचलण्यास नव्या खाजगी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप हा कचरा शहरात तसाच पडून राहिल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.विविध हॉटेलांसमोर प्लॅस्टिक पिशव्यांत हा कचरा टाकून भर रस्त्यावर टाकण्यात आल्याने या कचऱ्यामुळे आता शहरात फिरणाऱ्या नागरिकांना त्रास जाणवायला लागला आहे. या प्रकारामुळे दुर्गंधीसह शहराचे विद्रुपीकरणही सुरू असून शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या नावाने लोक बोटे मोडत आहेत.
दरम्यान,राजधानीत सध्या कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. पणजी महापालिकेकडून कचरा टाकण्यास जागा उपलब्ध करून देत नसल्याने सरकारच्या विरोधात वक्तव्ये केली जातात तर महापालिकेला बायंगिणी येथे जागा निश्चित करूनही तिथे कचरा टाकला जात नाही,असा आक्षेप सरकारकडून घेण्यात येतो. शहरातील विविध हॉटेलांचा कचरा उचलण्याचे कंत्राट असलेल्यांना महापालिकेने पैसे दिले नसल्याने या कंत्राटदारांनी कचरा उचलण्याचे बंद केल्याने शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.याप्रकरणी मुख्यमंत्री कामत,नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव, महापौर टोनी रॉड्रिगीस व हॉटेलमालक यांच्यात तोडगा काढण्याचे निश्चित झाले असले तरी आजही हा कचरा उचलण्यात आला नसल्याने आता परिस्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आज संध्याकाळी शहरात विविध ठिकाणी पाहणी केली असता हा कचरा तसाच पडून असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी तर चक्क सत्ताधारी गट शहराचे नाक कापण्यास पुढे सरसावल्याचा थेट आरोप केला.गोव्यातील एकमेव महापालिका म्हणून पणजीचे नाव आहे अशावेळी या महापालिकेचा कारभार पाहता पालिकांनी काय करावे,असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. नागरिकांनी निवडून दिलेल्या या लोकांना आता नागरिकांनीच जाब विचारावा असे आवाहन त्यांनी केले.
बायंगिणीत कचरा नकोच
नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी पणजी महापालिकेला बायंगिणीची जागा दिल्याचे स्पष्ट वक्तव्य केल्याने संतप्त बनलेल्या जुनेगोवे रहिवाशांनी बायंगिणी येथे कचरा टाकण्यात सक्त विरोध केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्य सचिव जे.पी.सिंग यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन सादर केले आहे. बायंगिणी ही जागतिक वारसा प्राप्त ठिकाण असल्याने तसेच इथे कचरा प्रकल्प उभा राहिल्यास त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने ही जागा रद्द करण्यात यावी,अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.या शिष्टमंडळात जुनेगोवेच्या सरपंच जेनिता मडकईकर,कृष्णा कुट्टीकर आदी हजर होते,अशी माहिती मिळाली आहे.

No comments: