दक्षिण गोव्यासाठी संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर
पणजी, दि.१७ (प्रतिनिधी)- गोव्यातील दक्षिण व उत्तर या लोकसभेच्या दोन्ही जागा भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा पक्षाचे प्रभारी तथा खासदार राजीव प्रताप रूडी यांनी केली. उत्तर गोव्यासाठी विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्या उमेदवारीची घोषणा यापूर्वीच झाली आहे तर दक्षिण गोव्यासाठी प्रदेश निवडणूक समितीने एकूण चार उमेदवारांची नावे निवडली असून ती केंद्रीय निवडणूक समितीकडे सुपूर्द करून त्यातील एकाची निवड होईल,असेही श्री.रूढी यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गोव्यातील उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी काल गोव्यात दाखल झालेले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा गोव्याचे प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.दक्षिण गोव्यासाठी निवडणूक समितीने शिफारस केलेल्या नावांत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर,नरेंद्र सावईकर,प्रकाश वेळीप व राजेंद्र आर्लेकर यांचा समावेश आहे.
दरम्यान,विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या बैठकीत आपल्या काही वैयक्तिक कारणांत्सव निवडणूक लढवण्यास अनिच्छा दर्शवल्याची माहिती श्री.रूडी यांनी दिली.पर्रीकर यांनी नोंदवलेली अनिच्छा नोंद करून घेण्यात आली असून ही सर्व नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.येत्या १९,२० व २१ जानेवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून त्यावेळी देशभरातील विविध राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची निवड केली जाणार असल्याची माहितीही यावेळी श्री.रूडी यांनी दिली.
काल प्रदेश कार्यकारिणी सदस्य व आमदार यांची संयुक्त बैठक बोलावून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला.यावेळी दक्षिण गोवा लोकसभा उमेदवारीबाबतही मते जाणून घेतली,असे ते म्हणाले.कालच्या बैठकीनंतर आज सकाळी प्रदेश निवडणूक समितीची बैठक झाली व या बैठकीत एकूण चार नावांची निश्चिती करून ती केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.आगामी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी भाजपने सुरू केली आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आले आहे. आता उमेदवारांची निश्चिती करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
दहशतवादाचा धोका, महागाई, आर्थिक मंदी,बेकारीची भीषण समस्या हे विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील.देशात आर्थिक मंदीमुळे कोट्यवधी लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.गेल्या वर्षभरात १० लाख कापड कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. सुमारे १ कोटी कापड कामगारांवर उपासमारीची पाळी येणार आहे.आर्थिक मंदीची वेळीच दखल घेऊन उपाययोजना केली असती तर ही वेळ ओढवली नसती,असेही श्री.रूडी म्हणाले.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष, शेतकऱ्यांची फरफट,पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात अपयश आदी विषयही प्रचारात येणार आहेत.सुशासन हा तर भाजपचा मंत्रच असून त्या आधारेच प्रचारात उतरणार असल्याचेही श्री.रूडी यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक लढवणार नाही ः पर्रीकर
दक्षिण गोवा लोकसभेसाठी आपल्या नावाचा विचार होत असला तरी वैयक्तीक कारणांमुळे ही निवडणूक लढवणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.प्रदेश निवडणूक समितीने आपल्या नावाची शिफारस केली आहे. तथापि यापूर्वीच आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काल निवडणूक समितीच्या बैठकीतही आपण आपली हीच भूमिका गोव्याचे प्रभारी राजीव प्रताप रूडी यांच्यापुढे ठेवली आहे, त्यामुळे दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत आपण उतरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असे ते म्हणाले.
Sunday, 18 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment