Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 19 January 2009

मडगाव बनवा जागतिक दर्जाचे व्यापारी केंद्र
सध्याचे शहर पुरातन विभाग जाहीर करा
शहर विकास आराखड्याच्या सादरीकरणात शिफारशी
मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) ः- मडगाव शहरासाठी विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविलेले नामवंत आार्किटेक्ट राहुल देशपांडे यांनी आज आपल्या आराखड्याचे सादरीकरण रवींद्र भवनात केले. त्यात अंबाजी- दवंदे येथे दोन्ही बगलरस्त्यांच्या संगमानजिक भव्य असे जागतिक दर्जाचे व्यापारी केंद्र विकसित करणे व शहराचा आत्ताचा भाग पुरातन विभाग म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करतानाच तेथे आणखी कॉंक्रीट जंगल उभे राहू नये म्हणून तेथील विकासकामे गोठविणे या शिफारशींचा समावेश आहे. २०३० पर्यंत अमलात आणावयाचा हा आराखडा आहे.
शहरातील पूर्व व पश्चिम बगलरस्ते तसेच वर्तुळाकार रस्ते युध्द पातळीवर पूर्ण करणे, शहराच्या मध्यवर्ती भागांत एकाच जागी केंद्रित झालेले पेट्रोलपंप लगेेच शहराबाहेर हलविणे व त्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करणे व त्या जागी पार्किंगची व्यवस्था करून रस्त्यांवरील बोजा कमी करणे, शहरांत रस्त्यांचे जाळे तयार करणे, शहरांतील व विशेषतः मोती डोंगरावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन करणे व नवीन झोपड्या उभ्या राहणार नाहीत याची दक्षता घेणे अशा साऱ्या महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आलेल्या आहेत.
ते म्हणाले की बगलरस्त्यांच्या संगमावरील या व्यापारी केंद्राला चांगला लाभ तर होईलच शिवाय त्यामुळे आजवर या शहराला व्यापारी राजधानी म्हणून असलेली मान्यताही कायम राहील. या केंद्रांत कोणकोणती दालने असावीत ते सरकारला त्या त्या क्षेत्रांतील जाणकारांशी चर्चा करून ठरविता येईल , ते म्हणाले.
हा आराखडा तयार करण्यापूर्वी समाजाच्या सर्व थरांतील लोकांची मते जाणून घेतली गेली व अधिकतम लोकांचा कल मडगावचे स्वरूप आता आहे तसेच राखून ठेवले जावे असे दिसून आले असेही त्यांनी नमूद केले.
मडगावात एकूण १६०० झोपड्या आहेत व एका मोती डोंगरावरील झोपड्यांची संख्या ५०० आहे. या लोकांचे खास केंद्रीय योजनेखाली पुनर्वसन केले तर मोती डोंगराचा विकास पर्यटनस्थळ म्हणून करता येण्यासारखा आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी पर्यटक मडगाव मार्गे जातात पण खुद्द मडगावात पर्यटकांसाठी कोणतेच पर्यटन केंद्र नाही यास्तव मडगाव सभोवतालच्या टेकड्यांचा व येथील पुरातन घरांचा पर्यटन स्थळ म्हणून चांगला उपयोग वारसा या संकल्पनेवर आधारून करता येईल. असे त्यांनी सुचविले. ते म्हणाले शहरांतील अनेक पुरातन घरे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत सरकारने ती पुरातन म्हणून जाहीर केल्याने घरमालकांना ती दुरुस्त करता येत नाहीत की सरकार ती दुरुस्त करत नाही पण अशा प्रकारे पर्यटन स्थळे म्हणून ती जाहीर केल्यास त्यांच्या जतनाचा मार्ग मोकळा होईल.
या संदर्भात त्यांनी मडगाव नगरपालिका इमारत, गांधी मार्केट व नवाबाजार इमारत, कोमुनिदाद इमारत या वास्तूंचा या पुरातन वास्तूंत समावेश करता येईल असे सुचविले.
जिल्हाधिकारी कार्यालय, हॉस्पिटल , बसस्टॅंड सारखे प्रकल्प बाहेर गेले आहेत व दोन्ही बगलरस्त्याने व वर्तुळाकार मार्गाने सर्व वाहतूक वळविल्यानंतर शहरातील वाहतूक ताण कमी होईल व त्यानंतर आबादे फारीय मार्ग संपूर्णतः पादचाऱ्यांसाठी ठेवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
त्यांच्या शिफारशींत जुन्या बाजारांतील वाहतूक बेटाजवळ उड्डाणपुलांचाही समावेश आहे त्यामुळे कुठेच वाहतूक कोंडी होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. उदाहरणादाखल बसस्टॅंडवरून बाहेर पडलेल्या वा फोंडा किंवा पणजीकडे जाणाऱ्या बसेसने कोलवा जंक्शनपर्यंत न येता परस्पर आपला मार्ग पकडायचा असे रस्ते वा उड्डाणपूल विकसीत करावयाचे आहेत त्यामुळे ही कृत्रिम वाहतूक कोंडी टळेल.
ते म्हणाले, की मडगाव हे कुजू घातलेले शहर नाही तर आजारी शहर आहे. त्याच्या तुंबलेल्या रक्त वाहिन्या मोकळ्या केल्या तर त्याचा आजार नाहीसा होईल.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळास मडगाव विकासाचा आराखडा तयार करण्यास सांगितले होते व महामंडळाने ते काम आर्किटेक्ट राहुल देशपांडे यांच्याकडे सोपविले होते.

No comments: