अनेक जणांना गंडवणारा
तोतया पोलिस गजाआड
मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी) - मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांनंतर गोव्यात कडक केलेल्या सुरक्षेचा गैरफायदा घेत पोलिस असल्याचे सांगून दोन महिलांसह एकूण ५ ते ६ जणांना लुबाडणाऱ्या तोतया पोलिसाला काल उत्तररात्री मडगाव पोलिसांनी गोम्सवाडा माजोर्डा येथे तो लपून बसलेल्या ठिकाणी छापा टाकून अटक केली. संशयिताचे नाव ऑगस्टिन सुप्रियानो कार्व्हालो असे आहे.
त्याने मडगावात राहाणाऱ्या मोहन मारकंडी यांचे ४ जानेवारी रोजी एटीएम कार्ड व कोडक्रमांक घेऊन त्यांना २० हजारांना टोपी घातली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्याचा सुगावा लागल्याने तो लपून बसला होता. निरीक्षक राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. त्याने ओळख पटवण्याच्या बहाण्याने मारकंडी यांचे एटीएम कार्ड घेऊन ते कार्यरत करून दाखवण्यास सांगितले होते व नंतर ते घेऊन २० हजारांची रक्कम काढली होती.
त्यापूर्वी डिसेंबर मध्ये त्याने चिंचोणे येथे अग्रवाल नामक सुताराला रात्रीच्या वेळी पोलिस असल्याचे सांगून ओळख पटविण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्ड घेऊन १५ हजारांची रक्कम काढली होती. या दोन्ही ठिकाणी तो एकाच प्रकारची मोटरसायकल घेऊन आला होता व तिचा रंग व बनावट क्रमांकावरून ती व्यक्ती एकच असावी असा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. सदर अग्रवाल याला आज ओळख परेडीसाठी आणले असता त्याने ती व्यक्ती म्हणजे कार्व्हालोच असल्याचे सांगितले.
चतुर्थीच्या काळात राय येथे एका महिलेचे ८० हजारांचे दागिने लंपास करणारा तसेच डिसेंबरमध्ये पाजिफोंड येथील एका भाजीविक्रेतीची सोनसाखळी लांबवणारा तोतया पोलिस हाच असावा, असा पोलिसांना संशय आहे.पालिका इमारतीमागे शेल्डेकर नामक इसमाची साखळीही अशाच तोतया पोलिसाने पळवली होती. त्यातही या आरोपीचा हात आहे की काय यादृष्टीने तपास सुरू आहे.
Tuesday, 20 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment