Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 20 January 2009

वेतन आयोगप्रश्नी त्रुटी
दूर करण्याची मागणी

पणजी,दि.१९(प्रतिनिधी) - सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत अनेक त्रुटी राहिल्या असून त्या तात्काळ दूर कराव्यात अशी मागणी गोवा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केली आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री कामत यांची भेट घेतली.यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करून याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची विनंती त्यांनी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेली १ जानेवारी २००६ ते ३१ ऑगस्ट २००८ पर्यंतच्या थकबाकीवर निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.रजेवर मिळणारी रोख रक्कम, वेतनश्रेणीतील तफावत आदी विषयांवरही तोडगा काढण्याची मागणी यावेळी संघटनेतर्फे करण्यात आल्याचे श्री.शेटकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान,याप्रकरणी मुख्यमंत्री कामत यांनी वित्त सचिव उदीप्त रे यांच्यासोबत येत्या आठवड्यात बैठक बोलावण्याचे आश्वासन कर्मचारी संघटनेला दिले. विविध मागण्यांचा आर्थिक भार किती होईल याचा अहवाल तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.रजेवर मिळणाऱ्या रोख रकमेची सुविधा संघटनेला विश्वासात न घेताच बंद करण्यात आल्यानेही संघटनेने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कामत यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.

No comments: