लढाऊ विमाने व हजारो जवान
साठच्या दशकातील राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडी यांच्याप्रमाणेच ओबामांची स्थिती होऊ नये म्हणून वॉशिंग्टनमध्ये ४५ हजार जवान, हजारो पोलिस, गुप्तचर एजन्सींचे एजंट आणि राष्ट्रीय गाडर्स तैनात केले होतेे. याशिवाय ९/११ सारख्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी ११ लढाऊ जेट विमाने आकाशात घिरट्या घालत होती.
"मी कधीच थकत नाही'
विशेष म्हणजे शपथविधीपूर्वी २४ तास आधी ओबामांनी चक्क एक भिंत रंगविली. "ही एक चांगली सवय व सराव आहे. कारण उद्या मी नव्या घरात प्रवेश करणार आहे,' असे ओबामांनी त्यांच्यासोबत असलेल्या स्वयंसेवकांना सांगितले. "तुमच्या चेहऱ्यावर घाम दिसत आहे. तुम्ही थकलात काय,' असा प्रश्न एका मुलाने ओबामा यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, मी कधीच थकत नाही. तू कधी मला थकलेले बघितले आहेस काय?
वॉशिंग्टन, दि. २० : तब्बल वीस लाखांची उपस्थिती, शोभेच्या दारुकामाची आतषबाजी, नव्या आशाआकांक्षा जागवत कॅपिटल हॉलमध्ये एका अभूतपूर्व सोहळ्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.३० वाजता बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा साऱ्या जगाने त्यांना कुर्निसात केला! अमेरिकेचे मुख्य न्यायमूर्ती जॉन रॉबर्टस् यांनी त्यांना अधिकार व गुप्ततेची शपथ दिली. त्याचबरोबर जागतिक राजकारणात एका ऐतिहासिक व नूतन अध्यायाचा आरंभ झाला.
अश्वेतांना समान अधिकार मिळावे. त्यांना सन्मानाने जगता यावे तसेच वर्णद्वेषाविरुद्ध ज्या देशाने प्रदीर्घ लढ्याचा अनुभव घेतला त्या अमेरिकेत अश्वेत बराक ओमाबांची निवड राष्ट्राध्यक्षपदी झाली हा एक प्रकारे काव्यगत न्यायच म्हणावा लागेल. म्हणूनच जेव्हा ओबामा यांनी प्रत्यक्ष शपथ घेतली तेव्हा ते दृश्य पाहून जगभरातील अश्वेतवर्णीयांचे डोळे पाणावले. ताडताड पावले टाकत प्रचंड आत्मविश्वासाने भारलेल्या ओबामा यांचे शपथग्रहण सोहळ्याच्या स्थळी आगमन झाले तेव्हा किती तरी वेळ "ओबामा, ओबामा' असा जयघोष सुरू होता. त्यांच्याकडून जागतिक पातळीवर किती प्रचंड अपेक्षा आहेत याचे अनोखे चित्रच त्याद्वारे प्रतिबिंबित झाले होते.
डॉ. किंग यांनी ज्या अमेरिकेची स्वप्न बघितले होते. तशी अमेरिका घडविण्यासाठी नागरिकांनी आपसातील भेदभाव विसरून एकत्र जमावे असे आवाहनही राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी ओबामा यांनी केले होते.
चिरेबंदी सुरक्षाव्यवस्था
अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या जिवाला सर्वाधिक धोका आहे. अमेरिकेच्या इतिहासात आजवर जेवढे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आबामांच्या जिवाला धोका असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मंदीचा मार सहन करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला वाचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारे ४७ वर्षीय ओबामा यांना दहशतवादी संघटनांकडून सर्वाधिक धोका आहे. कारण सध्या ते अल कायदा, कू क्लुक्स क्लान, नियो नाझी आणि तालिबानसारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांचे पहिले लक्ष्य आहेत. आणि खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही याची जाणीव आहे. बराक यांच्या जिवाला धोका असल्यामुळे शपथ ग्रहण समारंभाचे वेळी न भूतो न भविष्यती असा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.ला शपथ ग्रहण समारंभाचे वेळी लष्कराच्या छावणीचे स्वरूप आले होते. दहशतवादी संघटना ओबामांना संपविण्याचा प्रयत्न करणार असल्यामुळे बॉम्ब प्रुफ लीमो कार नेहमीच त्यांच्या तैनातीत राहणार आहे. बुलेट प्रुफ काचेच्या आत त्यांनी शपथ घेतली.
ओबामांचा शपथ ग्रहण समारंभ आणि नियमित सुरक्षा व्यवस्थेची आखणी करताना लष्करी अधिकाऱ्यांनी स्निपरपासून ते रासायनिक हल्ल्यापर्यंतच्या सर्व शक्यता ध्यानात घेतल्या. अनेक दिवस चर्चा केल्यानंतरच सुरक्षेचे उपाय करण्यात आल्याची माहिती एफबीआयचे संचालक जोए पर्सिचिनी यांनी दिली.
वॉशिग्टन शहर व त्याच्या परिसरातही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त होता. अद्याप कोणत्याही हल्ल्याची धमकी मिळाली नसली तरी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी गुप्तचर एजन्सीवर असते. त्यामुळे त्यांनी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर त्यांचे लक्ष्य होते. देशातील ९६ सुरक्षा एजन्सींचे ४ हजार कर्मचारी व तेवढेच पोलिस अधिकारी संपूर्ण अमेरिकेतील हालचालींवर लक्ष ठेवून होते.
एकजुटीचेे आवाहन
बराक ओबामा यांनी मार्टिन ल्यूथर किंग यांच्या बायबलवर हात ठेऊन अमेरिकेच्या ४४ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष आहेत. शपथ घेण्याआधी त्यांनी सर्व अमेरिकन जनतेला एकजुटीचे आवाहन केले. अश्वेत वर्णीयांच्या अधिकारांचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या मार्टीन ल्यूथर किंग यांचे स्मरण करून देताना ओबामा म्हणाले, अशा महान व्यक्तींनाही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर मग आपल्यासारखा सामान्यांनी समस्यांना घाबरून हातावर हात धरून बसणे योग्य नाही. याच किंग यांनी असा एक दिवस येईल ज्या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर अश्वेत व्यक्ती विराजमान झालेला दिसेल असे भाकित केले होते. आणि ओबामांनी शपथ ग्रहण केल्यानंतर ते खरे ठरले.
ओबामा यांचा विजयच काय पण शपथ ग्रहण समारंभही ऐतिहासिक ठरला. या समारंभात २० लाख लोक सहभागी झाले होते. बराक यांच्या विजयानंतरच अर्थिक मंदीच्या संकटावर मात करण्याच्या देशवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या हे विशेष.
विश्वातील १७ देशांच्या १७,३५६ लोकांची मते मागवून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाद्वारे ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच आर्थिक संकटावर मात करण्याचा आशा वाढल्या होत्या हे स्पष्ट झाले आहे. ६७ टक्के लोकांनी अमेरिकेचे जगासोबत संबंध सुधारतील असे मत दिले आहे.
---------------------------------------------------------------------
स्वप्न साकार झाले...
मार्टिन ल्यूथर किंग यांच्या जन्मदिनानिमित्त बराक यांनी एका दिवसांपूर्वी त्यांना आदरांजली वाहिली आणि अमेरिकन जनतेला या समारंभात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी जनशक्तीला कमी लेखण्याची चूक कधीच करू नका कारण अनेक चमत्कार घडविण्याचे त्यात सामर्थ्य असते असे मत व्यक्त केले.
ओबामा राष्ट्राध्यक्षपदी आरुढ होण्याच्या एक दिवस अगोदर किंग यांच्या जन्मदिनाची राष्ट्रीय सुटी होती. शपथविधीच्या आधल्या दिवशी किंग यांचा जन्मदिन असावा हा देखील एक योगायोग आहे. कारण १९६३ साली किंग यांनी केलेले भाषण "आय हॅव अ ड्रिम' अमेरिकन जनतेच्या हृदयावर कायमचे कोरले गेले आहे. ते स्वप्न आता साकार झाल आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment