Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 19 January 2009

मुंबईवरील हल्ल्यातील गुन्हेगार
पकडले जातील : पाकिस्तान
पुरावे "दिशादर्शक आणि सूचक'

इस्लामाबाद, दि.१८ - मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणणारे सर्व गुन्हेगार पकडल्या गेलेच पाहिजेत असे पाकिस्तानने आज म्हटले आहे. या कामात भारतीय तपासयंत्रणेची मदत मिळाल्यास आम्ही तिचे स्वागत करू असेही पाकिस्तानने म्हटले.
पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी, या घृणास्पद दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या प्रत्येकावर देशातील दहशतवादविरोधी कायद्याप्रमाणे खटला चालविला जाईल, असे म्हटले आहे.
कालच मलिक यांनी, मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानला भारताकडून मिळालेले पुरावे "दिशादर्शक आणि सूचक' असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांना कोण पाठिंबा देईल? असा प्रश्न त्यांनी आज लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना केला. विरोधी पक्ष नेते नवाज शरीफ आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असलेले त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना मुंबई हल्ल्याच्या पाकिस्तानच्या चौकशीविषयी माहिती देण्यासाठी ते येथे आले होते.
यापूर्वी, जीओ न्यूज या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानी कायद्यानुसार मुंबईतील हल्ल्याची चौकशी सुरू असल्याचे आणि याबाबत पाकिस्तानी सरकार बाह्य दबावाखाली येणार नसल्याचे ते म्हणाले होते.
इतर देशांकडून चौकशीसाठी कुठलीच मदत घेतली जाणार नाही, असे म्हणत असताना भारतीय तपास यंत्रणांच्या मदतीचे मात्र आम्ही स्वागत करू, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान "खुल्या मनाने' भारतीय तपास यंत्रणांचे स्वागत करेल आणि चौकशीसाठी येथे त्यांना संपूर्ण मुभा आणि सहकार्य दिले जाईल, असे ते म्हणाले.
भारताने सुद्धा पाकिस्तानच्या या भूमिकेचे स्वागत करावे आणि पाकिस्तानी चौकशी यंत्रणांना भारतात जाऊन या हल्ल्याची चौकशी करू द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कायद्यासमोर टिकतील अशा पुरांव्यांखेरीज पाकिस्तानची चौकशी पुढे जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.

No comments: