इस्लामाबाद, दि. १६ ; मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी कोणीही संशयित पाकिस्तानी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पण, त्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी कायदा लागू होईल, असे स्पष्टीकरण पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिले आहे. दरम्यान, मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या प्रमुख सूत्रधारांना पाकिस्तानने भारताच्या हवाली करावे. त्यांना भारतीय कायद्यानुसारच शिक्षा दिली जाईल. आमच्या या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही तसेच यासंदर्भात आम्ही कोेणत्याही प्रकारे मवाळ धोरण स्वीकारलेले नाही, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज नवी दिल्ली येथे स्पष्ट केले.
मुंबई हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानने एका तीन सदस्यीय पथकाची स्थापना केली आहे. त्याचे नेतृत्व फेडरल एजन्सीचे अतिरिक्त महासंचालक जावेद इक्बाल यांच्याकडे आहे. या पथकाची घोषणा मलिक यांनी केली. त्यांनी सांगितले की, मुंबई हल्ल्याची चौकशी आम्ही आमच्या स्तरावर करणार आहोत. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाला काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. मुंबई हल्ल्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा संशय असणाऱ्या कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा या पथकाला अधिकार राहणार आहेत.
शिवाय, ही तीन सदस्यीय समिती मुंबई हल्ल्यासंदर्भात मिळालेली कोणतीही माहिती थेट भारतीय चौकशी संस्थांना देऊ शकते किंवा त्यांच्याकडून यासंदर्भातील अन्य माहितीचेही आदान-प्रदान करू शकते. संशयितांवर पाकिस्तानातील दहशतवादविरोधी कायद्यानुसारच कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर आम्ही पाकमधील कोणत्याही संशयिताला भारताकडे सोपविणार नसल्याचेही मलिक यांनी पुन्हा सांगितले.
-------------------------------------------------------------
मुखर्जी यांचे घुमजाव
नवी दिल्ली : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना पाकिस्तान सरकार त्यांच्या कायद्यानुसार शिक्षा देऊ शकते परंतु ही सर्व कारवाई पारदर्शी असावी, असे प्रणव मुखर्जी यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेे होते. त्यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्याने भारतातच कारवाई केली जाणार असल्याचा खुलासा मुखर्जींनाच आज करावा लागला आहे. आपल्या आजच्या खुलाशात प्रणाव मुखर्जी यांनी सुस्पष्ट केले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांना पाकिस्तानने भारताच्या हवाली करावे, या आमच्या मागणीत वा भूमिकेत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. मुंबईवरील हल्ल्यातील गुन्हेगार हे पाकिस्तानी नागरिक आहेत म्हणून त्यांना सूट देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. या गुन्हेगारांना पाकिस्तानने भारताच्या हवाली करावे. त्यांना भारतीय कायद्यानुसारच शिक्षा सुनावली जाईल, याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले.
पाकिस्तानवर टाकण्यात आलेला दबाव कमी करण्याचाही आमचा विचार नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, या गुन्हेगारांना शोधून काढून प्रत्येकाला शिक्षा ठोठावणे पाकिस्तानवर बंधनकारक आहे. पाकिस्तानमध्ये वास्तव करून असणाऱ्या नागरिकाने दुसऱ्या देशात जाऊन तेथे गुन्हे करू नयेत याची खबरदारी पाकिस्तानला घ्यावयाची आहे. पाकिस्तानी गुन्हेगारांनी भारतात येऊन दहशतवादी हल्ले केले आहेत. त्यात शेकडो लोक ठार झाले आहेत. त्यामुळे या हल्ल्यांना दोषी असणाऱ्यांना भारतीय कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाईल. पाकिस्तानी प्रत्यार्पण कायद्याकडे लक्ष वेधत मुखर्जी यांनी सांगितले की, पाकिस्तानी कायद्यानुसार ज्या देशांशी पाकिस्तानचा अधिकृतपणे प्रत्यार्पण करार झालेला नाही त्या देशांनाही पाकिस्तान गुन्हेगार सोपवू शकतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment