रिवण येथील खाण प्रकरणी
पर्यावरण मंत्रालयास नोटीस
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - रिवण सांगे येथील राखीव जंगलात खाणीचे काम सुरू असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोटीस बजावली आहे. येत्या तीन आठवड्यांत या नोटिशीला उत्तर देण्याचा आदेशही खंडपीठाने आज दिला. राखीव जंगलाच्या २५ हेक्टर भागात सदर खाण कार्यरत असल्याचा दावा आज ऍड. नॉर्मा आल्वारिस यांनी न्यायालयात केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. तथापि, संबंधित खाण व्यवस्थापनाने आपल्याकडे सर्व परवाने असल्याचा दावा केला आहे.
रिवण सांगे येथे ८० हेक्टर जमिनीत खाणीचे काम सुरू असून त्यातील २५ हेक्टर जागा राखीव जंगलात येते. त्याचप्रमाणे या खाणीची भाडेपट्टीही २००७ साली रद्द झाल्याचा दावा ऍड. आल्वारिस यांनी केला. यापूर्वी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या खाणीवर कारवाई केली असून त्याचे कामही बंद ठेवलेले आहे, अशी माहिती यावेळी न्यायालयात देण्यात आली.
सदर खाण सलीम शेख नामक व्यक्ती चालवत असून खाणीची भाडेपट्टी प्रशांत नाईक यांच्या नावे आहे. या खाणीवर काम सुरू करण्याचे सर्व परवाने आपल्या आशीलाकडे असून सर्व खात्यांची मान्यताही असल्याचा दावा खाण व्यवस्थापनातर्फे युक्तिवाद करणारे ऍड. सुरेश लोटलीकर यांनी केला. तसेच या खाणीला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडूनही परवानगी मिळाल्याचा दावा ऍड. लोटलीकर यांनी केला. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पुढील सुनावणी २९ जानेवारी ०९ रोजी ठेवण्यात आली आहे.
Tuesday, 20 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment