बंगलोर, दि.२५ : देशाचे `आयटी हब' असलेले बंगलोर शहर आज बॉम्बस्फोट मालिकेने हादरले. अवघ्या २० मिनिटांत एकामागोमाग सात बॉम्बस्फोट "टायमर'च्या माध्यमातून घडवून आणण्यात आले. या स्फोट मालिकेत एका महिलेसह तीन जण ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत. हे सर्वच स्फोट दक्षिण बंगलोरमध्ये झाले. या स्फोटमालिकेची केंद्रातील संपुआ सरकारने नेहमीप्रमाणेच निंदा केली आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि पंजाब येथे अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दुपारी १.३० ते १.५० अशा २० मिनिटांमध्ये हे स्फोट घडविण्यात आले. पहिला स्फोट मडीवाल भागातील बस स्थानक भागात झाला. या स्फोटात स्थानकावर बसच्या प्रतीक्षेत उभी असलेली महिला जागीच ठार झाली. तर, तिचा पती आणि आणखी काही जण गंभीर जखमी झाले. यानंतर अवघ्या दोन मिनिटातच दुसरा स्फोट आरगुडी येथे झाला. तिसरा स्फोट सरजापूर रोड भागात, चौथा स्फोट माल्या रुग्णालय येथे, पाचवा स्फोट पार्लफोर्डस् बगिच्यात, सहावा स्फोट विठ्ठल माल्या भागात झाला. सातवा स्फोट पॅंथरपाल्या भागात झाला, अशी माहिती पोलिस आयुक्त शंकर बिदारी यांनी पत्रकारांना दिली.
या स्फोटांमध्ये एकूण तीन जण ठार झाले असून, अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून, त्या सर्वांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन ठिकाणी बॉम्बची तीव्रता फार जास्त होती. तथापि, अन्य भागात झालेले स्फोट कमी क्षमतेचे होते. यापैकी एका भागात पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या आणि पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली आहे.
दहशतवादी कृत्य
दरम्यान, केंद्र सरकारने या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला. पाकधार्जिण्या लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी सांगितले.
अतिसतर्कतेचा इशारा
या स्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबई, कोलकाता, पंजाबसह अन्य शहरांमध्ये अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वच पोलिस ठाण्यांना दक्ष राहण्याची सूचना गृहमंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
आर्थिक मदत जाहीर
कर्नाटकच्या सरकारने स्फोटांत ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार उचलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Friday, 25 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment