पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) : ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग खून प्रकरणातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक नेर्लन आल्बुकर्क याला अटक करायची झाल्यास दोन दिवस आधी त्याविषयीची लेखी नोटीस द्यावी लागेल, असा आदेश आज बाल न्यायालयाने देऊन त्याबाबतचा अर्ज निकालात काढला. मात्र, आल्बुकर्क याला कशासाठी अटक करणार याचे कोणतेही कारण सीबीआयने न्यायालयाला दिलेले नाही.
स्कार्लेट खून प्रकरणाच्या तपासाचे काम "सीबीआय'कडे दिल्याने गेल्या काही महिन्यांपासून सीबीआय अधिकाऱ्यांनी अनेकांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. त्याद्वारे काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा सीबीआयने केला आहे. मात्र, आल्बुकर्क याला कशासाठी ताब्यात घेण्याची गरज आहे, हे "सीबीआय'ने न्यायालयातही उघड केलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून "सीबीआय' आल्बुकर्क याच्या घराशी संपर्क साधून असल्याने १८ जुलै रोजी आल्बुकर्क याने आपल्या वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणात सुरुवातीला उपनिरीक्षक नेर्लन आल्बुकर्क याने हलगर्जीपणा केल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते आणि मग सेवेतून बडतर्फ केले होते. दरम्यानच्या काळात स्कार्लेटची आई फियोना हिने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. सीबीआय सध्या त्या दिशेने तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment