Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 July 2008

सत्तापिपासू राजकारणामुळे कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड

श्रीपाद नाईक यांची कडाडून टीका
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) : संसदेत विश्वासमत ठरावावेळी कॉंग्रेसने केलेले नाटक संपूर्ण देशाने व जगाने पाहिले. सत्ता टिकवण्यासाठी पैशांचा सर्रासपणे वापर होत असल्याच्या बातम्या अखेरच्या क्षणी खऱ्या ठरल्या व भाजप खासदारांना देऊ केलेले पैसे थेट संसदेतच हजर केल्याने कॉंग्रेसचे घाणेरडे राजकारण उघडकीस आले,असे सांगून कॉंग्रेसच्या या कृतीचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी निषेध केला.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष सुभाष साळकर हजर होते. भाजप खासदारांना लाच देण्याच्या या प्रकाराबाबत पोलिस तक्रार का केली नाही,असे सांगताच पोलिस तक्रार केली असती तर पैशांबरोबर या खासदारांनाही गायब केले असते,असे श्री.नाईक म्हणाले.
भाजपच्या खासदारांनी पक्षाचा "व्हीप" धुडकावून पक्षविरोधी मतदान करण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. पक्षाशी गद्दारी केलेले बहुतेक नेते हे नव्यानेच पक्षात प्रवेश केलेले होते त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विजयाची खात्री असलेल्या निष्ठावंत व्यक्तींनाच पक्षाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे नाईक यांनी सांगितले.
भाजपाचे विचार व शिस्त जाणणारे नेते पैशांसाठी विकले जाणार नाहीत, परंतु राजकीय सोयीसाठी जवळ केलेल्या नेत्यांकडून जी लांच्छनास्पद कृती घडली त्यामुळे भाजपची बदनामी झाली हे साम्य करावेच लागेल,असे श्रीपाद नाईक यांनी मान्य केले. भाजप खासदारांना पैशांनी भरलेली बॅंग देण्याच्या या प्रकाराची चौकशी सभापती सोमनाथ चॅटर्जी हे करीत असल्याने लवकरच सत्य उजेडात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
२७ रोजी जाहीर सभा
संसदेत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने कावा करून ज्या पद्धतीने सत्ता टिकवण्यासाठी पैशांचा व लोकशाहीतील नीतिमत्तेचा खेळ मांडला त्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी व देशापुढील आव्हानांचा आढावा घेण्यासाठी भाजपतर्फे येत्या २७ रोजी पर्वरी येथील आझाद भवन येथे संध्याकाळी ३.३० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय नेते उपस्थित राहणार असून संसदेतील घडलेल्या "काळ्या दिवसा'चा निषेध यावेळी केला जाईल, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

No comments: