Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 July 2008

क्रिकेट तिकीट घोटाळा अन्य ८ जणांवरही आरोप निश्चित

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : एप्रिल २००१ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यामधील एक दिवसीय क्रिकेट सामन्याावेळी झालेल्या आणि देशभर गाजलेल्या बनावट तिकीट घोटाळा प्रकरणी मुख्य संशयित कायदेमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यानंतर उर्वरित आठ जणांवर आज आरेाप निश्र्चित करून येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी सुनावणी सुरू केली. त्यामुळे दीर्घ काळाने हे प्रकरण मार्गी लागले आहे. गेल्या १२ जून रोजी नार्वेकर व अन्य संशयितांवर आरेाप निश्र्चित करण्यात आले होते .
आज आरोप निश्चित केलेल्यांमध्ये रामा शंकरदास, विनोद फडके, चिन्मय फळारी, व्यंकटेश देसाई, जॉकी पिरीश, देवदत्त फळारी, गजानन भिसे व एकनाथ नाईक यांचा समावेश आहे.
आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करायची असल्याने व नंतर किमान सहा महिने विश्रांती घ्यावी लागणार असल्याने कोर्टात सुनावणीवेळी हजर रहाण्यापासून सवलत द्यावी अशी विनंती करण्यासाठी ते आले होते. न्या. कवळेकर यांनी सरकारी वकिलांशी सल्लामसलत करून ती सुनावणी त्या दिवशीच सुरू करताना त्यांच्यावरील आरोप निश्र्चित केले होते.
गेली ७ वर्षें कायद्याचा किस पाडण्यात आलेल्या या प्रकरणात ४-४-०६ रोजी तत्कालीन प्रथम श्रेणी न्यायाधीश ऍश्ली नोरोन्हा यांनी दयानंद नार्वेकर व अन्य आठ जणांवर आरोप पत्र निश्र्चित करण्याचा निवाडा दिला होता. त्या निवाड्याला नार्वेकर व इतरांनी वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे या अपीलावरील सुनावणी लांबत गेली. प्रथम ती न्या. बिंबा थळी व नंतर न्या. दिलीप गायकवाड यांच्यापुढे चालली. त्यांनीच याबाबतचे अपील फेटाळून आरोप निश्र्चित करण्याचा न्या. ऍश्ली नोरोन्हा यांचा निवाडा उचलून धरला व परत हा खटला प्रथमश्रेणी न्यायालयाकडे पाठवला होता.

No comments: