कोलकाता, दि.२३ : लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षादेश झुगारण्याची शिक्षा अखेर आज देण्यात आली. माकपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सोमनाथदांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही काढून घेण्यात आलेले आहे. माकपाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा, पक्षादेश धुडकावल्याचा व पक्षाचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला व हकालपट्टीची कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माकपाने सोमनाथदांना जरी पक्षातून काढून टाकले असले तरी ते लोकसभा सभापतिपदावर तूर्तास कायमच राहणार आहेत. विशेष म्हणजे, पक्षाने केलेल्या या हकालपट्टीमुळे "सोमनाथदांना खूप जबर धक्का बसला,'असे वगैरे काहीही झालेले नाही. त्यांनी या कारवाईची आधीच मानसिक तयारी केलेली होती. "माकप चाहे जो फैसला करे, वो ले'असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगून आपण कारवाईला भीत नसल्याचे दाखवून दिले होते.
अमेरिकेशी केलेल्या अणुकराराच्या मुद्यावरून केंद्रातील कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारचा बाहेरून दिलेला पाठिंबा डाव्या पक्षांनी चार वर्षांनंतर काढून टाकल्यानंतर सरकार अल्पमतात आले होते. अल्पमतात आलेल्या सरकारला संसदेत विश्वास ठराव मांडणे आवश्यक आहे, हे स्पष्ट असल्याने सोमनाथदांनी लोकसभा सभापतिपदाचा राजीनामा द्यावा, अशी माकपाची भूमिका होती. परंतु "लोकसभा सभापतिपद हे राजकारणाच्या चौकटीत येणारे नाही. हे घटनात्मक पद आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचे संसदेत प्रतिनिधीत्व करीत नाही त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,'असे सोमनाथदांनी ठामपणे सांगितले होते. सोमनाथदांनी राजीनामा देण्यास प्रत्येकदा नकार देऊनही माकपाचे महासचिव प्रकाश कारत यांनी त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव कायमच ठेवला होता. पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते व सलग २३ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे ज्योती बसू यांचीही मदत कारत यांनी सोमनाथदांची समजूत काढण्यासाठी घेतली होती. "पक्षादेश माना व पक्षाशी सुसंगत भूमिका घ्या,' असे बसूंनी सांगूनही पद न सोडण्यावर सोमनाथदा ठामच राहिलेत. विश्वास ठराव आटोपला, सरकार विजयी झाले व अखेर आज डाव्यांनी सोमनाथदांवरील कारवाईसाठी मुहूर्त काढला. माकपाच्या घटनेतील कलम १९/१३ अंतर्गत सोमनाथदांवर ही हकालपट्टी करण्याची कारवाई करण्यात आली. "पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेणाऱ्याला, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्याला पक्षातून बाहेर केले जाईल,' अशी तरतूद पक्षाच्या घटनेतील या कलम १९/१३ मध्ये आहे.
पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविलेले सोमनाथदा गेल्या ४० वर्षांपासून माकपामध्ये आहेत. १९६८ साली ते माकपाचे सदस्य बनले होते. सर्वप्रथम १९७१ साली ते लोकसभेत निवडून आले होते. तेव्हापासून ते आजवर दहादा लोकसभेत निवडून आलेले आहेत. अपवाद फक्त १९८४ सालचा! राजकीय सारीपाटावर "मुलुखमैदान तोफ' म्हणून ओळखल्या तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी १९८४ साली त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. सोमनाथदा सद्यस्थितीत बोलपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून १९९६ साली पुरस्कार मिळालेला आहे. अनेक संसदीय समित्यांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत.
Wednesday, 23 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment