पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : वेर्णा ते मुरगाव बंदरापर्यंतच्या चौपदरी महामार्गासाठी आधीच्या वेश्यावस्तीतून जाणाऱ्या १.१० किलोमीटर जागेबरोबरच आता आणखी २.५० किलोमीटर जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात येईल, असे आज सरकारने न्यायालयात सांगितले.
यापूर्वी तेथे वेश्यावस्ती असल्याने गेल्या काही वर्षांपासून ५.२० किलोमीटर जागेमुळे हा महामार्ग रखडला होता. आता केवळ १.६० किलोमीटर जागेत असलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी योग्य जागा नसल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील १.१० किलोमीटरची जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र आज खंडपीठात सादर करण्यात आले. याविषयी पुढील सुनावणी येत्या ३० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. गेल्यावेळी सदर जागेचा पंचनामा करून ती प्राधिकरणाच्या ताब्यात दिल्यानंतर २२ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
१८ जुलै रोजी पहिल्या टप्प्यातील जागा ताब्यात दिली असून त्याचबरोबर काटे ते बायणा (जोशी भाट) ही ४ हजार चौरस मीटर जागा मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात दिल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पहिल्या टप्यातील महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यास किमान दीड वर्ष लागणार आहे. या दरम्यान येथून स्थलांतरित होणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध लागणाऱ्या इमारतीचेही बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात १७७ बांधकामे आहेत. त्यातील ५० बांधकामे १८ चौरस मीटरपेक्षा कमी जागेत आहेत. त्यांना भरपाई देऊन ती पाडण्यात आली आहेत. अन्य बांधकामांपैकी एक बांधकाम १८ चौरस मीटरपेक्षा कमी जागेत आहे. दुसरे बांधकाम आंबेडकर क्लबच्या मालकीचे असल्याने त्यांनाही भरपाई देऊन ते पाडण्यात येणार असल्याची माहिती मुरगाव बंदराचे खास भूखंड ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्याने सरकारला दिली आहे. त्या दोन्ही बांधकामांना भरपाई देऊन ती बांधकामे पाडण्याची सूचना मुख्य सचिवांनी त्या अधिकाऱ्याला २१ जुलै रोजी झालेल्या बैठकीत दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील १२५ भाडेकरूंपैकी १८ भाडेकरू हे मच्छीमार असून त्यांना समुद्र किनाऱ्यावर स्थलांतरित केले जाणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती दक्षिण गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली होती. मुरगाव बंदराने ताब्यात घेतलेल्या "जोशी भाट' या जागेत मच्छीमारांसाठी इमारत उभारली जाणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment