Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 20 July 2008

रवींद्र भवन लोकार्पणप्रसंगी "ओडीपी' विरुद्ध निदर्शने

मडगाव, दि. 20 (प्रतिनिधी) - येथील रवींद्र भवनाच्या उद्घाटनाची संधी साधून केंद्रीय मंत्र्यांना मडगावातील अन्यायकारक ओ.डी. पी. बाबत निवेदन सादर करण्याचा नागरिक कल्याण समितीचा प्रयत्न केंद्रीय मंत्री अंबिका सोनी कार्यक्रमाला न आल्याने यशस्वी झाला नसला तरी आंदोलकांनी कार्यक्रम संपेपर्यंत रवींद्र भवनाच्या विरुद्ध बाजूला निदर्शने करून कार्यक्रमाला आलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेतलेच.
मुख्यमंत्र्यांनी काल ओ. डी. पी. रद्द करणे आता शक्य नाही असे जे निवेदन केले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या समितीने आज हा निदर्शनाचा निर्णय घेतला . आपल्या मागण्याचे फलक घेतलेले कार्यकर्ते व त्यातही महिला कार्यकर्त्या तेथे मोठ्या संख्येने हजर होत्या . पोलिसांनी नंतर त्यांना रस्त्यावरून बाजूला हटविले व मल्टिपर्पज सभागृहाकडील बाजूला थांबण्यास सांगितले तसेच रवींद्र भवनाकडून निदर्शक दिसू नयेत म्हणून पोलिस गाड्या आणून त्यांच्यासमोर रस्त्यावर ठेवण्यात आल्या.
निदर्शकांनी तोंडावर काळा कपडा बांधला होता व हातात ओडीपी रद्द करा या मागणीचे फलक घेतले होते. दरम्यान समितीच्या नंतर झालेल्या बैठकीत आपल्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments: