Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 21 July 2008

नवे राज्यपाल सिद्धू यांचा शपथविधी `गोव्याने खास प्रतिमा निर्माण करण्याची गरज'

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) : गोव्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाच्या दृष्टीने स्वतःची खास प्रतिमा निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त राज्यपाल डॉ. शिविंदरसिंग सिद्धू यांनी केले. आज राजभवनवर आयोजित केलेल्या शानदार सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांच्याकडून राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव जे. पी. सिंग आदी व्यासपीठावर हजर होते.
दोनापावला येथील काबो भवनावर उभारण्यात आलेल्या शानदार शामियान्यात आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळी, राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी व समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे नेतेही उपस्थित होते.
शपथविधीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ.सिद्धू यांनी गोव्यासंबंधी आपले विचार प्रकट केले. राज्यात कायदा सुव्यवस्था जपली जावी हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. राज्याला चांगल्या प्रशासनाची गरज असून विद्यमान सरकार ते देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याचा चौफेर विकास व्हावा यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सरकारला करणार असल्याचे ते म्हणाले.
पर्यटनदृष्ट्या गोव्याचा विस्तार होण्यासाठी विमानवाहतूक सेवेची नितांत गरज आहे. त्यामुळे गोव्यात होऊ घातलेला सुसज्ज विमानतळ राज्यासाठी उपयुक्तच ठरेल. दाबोळी विमानतळाबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याने त्यांना नवा विमानतळ आला तरी जुना विमानतळ बंद होणार नाही हे पटवून देण्याची नितांत गरज असल्याचेही सिद्धू यांनी स्पष्ट केले. कुठल्याही विकासकामांबाबत हिकमती राहणे हा आपला स्वभाव असल्याने विकासकामाची गती व परिपूर्णता याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्याचा आर्थिक विकास साधणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने पर्यावरण,आर्थिक व सामाजिक हिताचे रक्षण करून या क्षेत्रात आगेकूच करण्याची गरज आहे. राज्याला पेलवणारे व जबाबदार पर्यटनच हवे असे सांगून त्यात या क्षेत्राशी संबंधित सर्वांनाच विश्वासात घेणे महत्त्वाचे आव्हान असल्याचे संकेतही त्यांनी दिले. पर्यावरणाच्या हिताबाबत कोणतीही तडजोड परवडणारी नाही,असे सांगून त्यादृष्टीनेच विकासाची दिशा ठरवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
आपण सर्वसामान्य लोकांसाठी सहज उपलब्ध असू असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
आजच्या या सोहळ्याला राज्य मंत्रिमंडळातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. त्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे,पर्यटनमंत्री मिकी पाशेको, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर,महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा,जलस्त्रोत्रमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, नगरविकासमंत्री जोकिम आलेमाव, उपसभापती माविन गुदिन्हो, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, केप्याचे आमदार चंद्रकांत कवळेकर, कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर,थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर आदी सत्ताधारी पक्षातर्फे उपस्थित होते. भाजपचे बहुसंख्य आमदारही या सोहळ्याला जातीने हजर होते. त्यात आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर,दयानंद सोपटे,विजय पै.खोत,महादेव नाईक,मिलिंद नाईक,अनंत शेट,दिलीप परूळेकर यांचा समावेश होता. सभापती प्रतापसिंग राणे हे विदेशात असल्याने अनुपस्थित असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. या सोहळ्याला उद्योगपती श्रीनिवास धेंपे,अवधूत तिंबलो,आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विल्फे्रड डिसोझा, मगोपचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रा. सुरेंद्र सिरसाट आदी मान्यवरही यावेळी हजर होते.
राजकीय नेते चिंताग्रस्त !
आज शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे स्पष्ट संकेत दिसत होते. विरोधी भाजप आमदारांनी एकत्रितपणे सोहळ्याला हजेरी लावल्याने उपस्थित लोकांत काहीशी कुजबुज सुरू झाली होती. केंद्रातील सरकारच्या भवितव्यावर गोव्यातील राजकारणही काही अंशी निर्भर असल्याने येथील सर्व राजकीय नेत्यांचे डोळे केंद्राच्या राजकारणाकडे खिळून बसले आहेत. यावेळी विश्वजित राणे यांना विचारले असता त्यांनी कोणत्याही राजकीय हालचालींबाबत नकार दिला व हसतहसत याविषयावर अधिक बोलण्याचे टाळले.

No comments: