कामत सरकारवर खरपूस टीका
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील कॉंग्रेस सरकारला सहा आमदारांना एकत्र घेऊन पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्ही सरकारवर खूष नसल्याचे स्पष्ट करून पाळी मतदारसंघात पक्षाने आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रिड डिसोझा यांनी सांगितले.
राज्य कार्यकारिणीत आजच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाळी मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेसाठी मंत्री जुझे फिलिप डिसोझा उद्या (शुक्रवारी) दिल्लीला रवाना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. विली यांनी कामत सरकारवर खरपूस टीका केली. हे सरकार बाह्यविकास आराखड्याच्या नावाखाली "प्रादेशिक आराखडा २०११' ची अंमलबजावणी करीत असल्याचा जोरदार आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचा प्रादेशिक आराखडा २०११ तसेच "मेगा हौसिंग' प्रकल्पांना तीव्र विरोध असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे तीन, महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाचे दोन व अपक्ष अशा एका गटाने कामत सरकारला पाठिंबा दिला असून यात राष्ट्रवादीची संख्या सर्वाधिक म्हणजे तीन अशी आहे. त्यामुळे पाळी मतदारसंघात फक्त राष्ट्रवादीचाच उमेदवार उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अपक्ष आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता, त्यांना या गटाच्या नियमांनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल, असे डॉ. डिसोझा म्हणाले.
मेगा प्रकल्पांमुळे राज्यातील अनेक गावांत असंतोष निर्माण झाला आहे. पिळर्ण येथे असा प्रकल्प झाल्यास अनेक समस्या निर्माण होतील. त्याठिकाणी ५४ बंगले बांधण्यात येत आहे. दोन तरणतलावांच्या (स्विमिंग पूल) बांधकामांसाठी लागणारे पाणी तेथे नाही. त्यामुळे त्या भागात पाणी, कचऱ्याची विल्हेवाट व सांडपाणी आदी समस्या निर्माण होणार आहेत, असे ते म्हणाले. तेथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. या सर्व गोष्टीचा परिणाम या पिळर्ण गावावर होणार असल्याचे डॉ. डिसोझा म्हणाले. अशीच अवस्था कोलवा येथील लोकांची झाल्याने आम्ही या मेगा प्रकल्पांच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रादेशिक आराखड्याविरोधात गोवेकरांनी आंदोलन करून तो रद्द करण्यास भाग पाडल्याने आता तोच आराखडा राज्यातील प्रमुख शहरात बाह्यविकास आराखड्याच्या नावाने छुप्या पद्धतीने राबवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
Friday, 25 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment