पणजी, दि. 20 (प्रतिनिधी) - भरधाव येणाऱ्या एका लाल रंगाच्या मारुती व्हॅनने पर्वरी तिस्क येथे आज सायंकाळी 4.30 वाजता बसमधून उतरलेल्या दहा व्यक्तींना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर, अन्य सहा व्यक्ती गंभीर जखमी झाले. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. याची माहिती मिळताच जखमींना ताबडतोब उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. या जबरदस्त धडकेत रुद्रप्पा साधिया (45) हा जागीच ठार झाला तर, अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
जखमींमध्ये परशुराम परीश (36), शांता परिष (35), ललिता लमाणी (36), देवराज लमाणी (2), कुबेर महाराजा (30) व सुजता महाराजा (30) यांचा समावेश आहे. सर्व पर्वरी सांगोल्डा येथे राहणारी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हा अपघात होताच मारुती चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पर्वरी पोलिसांनी दिली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी त्या वाहनाचा क्रमांक नोंद करून पोलिसांना दिला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्या वाहनाच्या शोधात होते. प्राप्त माहितीनुसार सदर वाहन वर्षा सावंत या महिलेच्या नावावर नोंद असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार सांगोल्डा येथे राहणाऱ्या सात जणांचा कामगारांचा एक गट म्हापसा येथे रविवारचा बाजारहाट करण्यासाठी गेले होते. दिवसभर बाजारहाट करून सायंकाळी ते एका बसमधून पर्वरी तिस्क येथील रस्त्याच्या एकदम बाहेर असलेल्या बस स्थानकावर उतरले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या जीए 01 आर 5211 या लाल रंगाच्या "मारुती व्हॅन'ने या सात जणांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य गंभीर जखमी झाले. ज्याठिकाणी हे कामगार उतरले होते, तो बसस्थानक रस्त्याच्या एकदम बाजूला आहे. त्याठिकाणी ही व्हॅन मुख्य रस्ता सोडून कशी पोचली, हाच प्रश्न पर्वरी पोलिसांना पडलेला आहे. अपघात घडलेल्या ठिकाणी या कामगारांनी आठवडाभर काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी आणलेले धान्यांचा खच पडला होता.
याविषयाची अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड करीत आहेत.
Sunday, 20 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment