Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 July 2008

महापालिकेच्या बैठकीत प्रचंड गदारोळ

'तो' नगरसेवक व दोन आस्थापनांवर कारवाईचा निर्णय
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) : बेकायदा पे पाकिर्ंग शुल्क, उपमहापौर यतीन पारेख यांचा चीन दौरा या दोन मुद्यावरून पणजी महापालिकेच्या बैठकीत प्रचंड गदारोळ माजला. बेकायदा पे पार्किंग प्रकरणात अटक झालेल्या नगरसेवकावर (नागेश करीशेट्टी) आणि १८ जून रस्त्यावरील "वेर्णेकर डिझेल' तसेच नेवगीनगर येथील "तारकर शोरूम' या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बेकायदा पे पार्किंगच्या विषयावरून विरोधकांनी महापौर टोनी रॉड्रिगीस यांना धारेवर धरले. पे पार्किंगचा करार रद्द होऊनही त्याचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले नसल्याने पालिकेचा लेखाधिकाऱ्याची चौकशी करून त्याला त्वरित निलंबित करण्याची जोरदार मागणी नगरसेवक रुद्रेश चोडणकर यांनी केली.
या प्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली असून पोलिसांचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो येताच दोषींवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौरांनी दिले. विरोधकांनी या मुद्यावर महापौरांवर बोचरी टीका केली. आपली यात कोणताही चूक नसून कराराचे नूतनीकरण करण्याचे काम लेखाधिकाऱ्याचे असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे करारानुसार पालिकेला येणे असलेली रक्कम मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
उपमहापौर पारेख यांच्या चीन दौऱ्यावरून नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व उपमहापौर यांच्यात बरीच जुंपली. पारेख यांनी चीन दौरा महापालिकेच्या पैशांनी केल्याचा जोरदार आरोप फुर्तादो यांनी केला. हा आरोप खोडून काढताना पारेख यांनी फुर्तादोंवर तुफान टीका केली. अखेर महापौरांनी पारेख यांच्या हातातील "माईक' काढून घेतला. तथापि, पारेख यांनी पुन्हा "माईक' हिसकावून घेत टीकेचा मारा सुरूच ठेवला.
चीनमध्ये झालेल्या जगातील सर्व महापौरांच्या बैठकीत जाण्यासाठी पालिकेची परवानगी मिळवण्यासाठी उपमहापौरांनी स्वतःचीच सही करून पत्र बनवल्याची माहिती उघड करून फुर्तादो यांनी सर्वांना धक्का दिला. अखेर पारेख यांनी आपण चीन दौरा स्वखर्चाने केल्याचे सांगून त्याबाबतची बिलेही सादर केली.
१८ जून रस्त्यावर असलेल्या वेर्णेकर डिझेल यांनी आपल्या नावावरील दुकान अन्य कंपनीसाठी दिले असून त्यास त्वरित टाळे ठोकण्याची मागणी विरोधकांनी केली. महापालिकेच्या कायदा सल्लागाराने सदर दुकानाला टाळे ठोकावे, असे सुचवले असून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी विरोधकांनी केली. या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. नेवगी नगर येथे "तारकर ऑटोमोबाईल' यांनी पालिकेची परवानगी न घेता शोरूमचा काही भाग बेकायदा बांधल्याने त्यालाही टाळे ठोकण्याची मागणी स्वीकृत सदस्य दया कारापूरकर यांनी केली. त्यावर, त्यांची पाणी व वीजपुरवठ्याची जोडणी तोडण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली. दरम्यान, कॅसिनोविरोधात संमत झालेल्या ठरावात बदल करण्यात आल्याचा आरोप फुर्तादो यांनी केली.

No comments: