Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 22 July 2008

'हायक्विप'शी केलेला वादग्रस्त करार रद्द

कचरा जमा करण्याचे खाजगीकरण : मडगाव पालिकेचे निर्णय
मडगाव ,दि. २२ (प्रतिनिधी) : मडगाव पालिकेने आजच्या आपल्या खास बैठकीत, गेली दोन वर्षें कचरा प्रकल्प उभारणीबाबत कोणतेही काम न करता स्वस्थ बसलेल्या हैदबादस्थित हायक्विपबरोबरचा करार रद्द करण्याचा ठराव बहुमताने संमत केला. तसेच पालिका कक्षेतील कचरा गोळा करण्याच्या कामाचे खाजगीकरण करून त्यासाठी निविदा मागवण्याचाही निर्णय घेतला.
कचरा प्रकल्प उभारणीबाबत काय तो अंतिम निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने ४५ दिवसांची मुदत दिल्याने पालिका मंडळाच्या गळ्याला फास लागला होता. दुसरीकडे कुडतरी व घोगळ -अमृतनगर परिसरातील रहिवाशांनी सोनसोड्यावरील दुरावस्थेबाबत टोकाची भूमिका घेतल्याने पालिका अडचणीत आली होती. यास्तव काय तो सोक्षमोक्ष लागावा हाच या बैठकीमागील उद्देश होता.
हायक्विपबरोबरील करार रद्द करण्याचा ठराव माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी मांडला व सिरियाका यांनी त्यास अनुमोदन दिले. सावियो, घनःश्याम शिरोडकर यांनी यावेळी कचरा प्रकरण व उच्च न्यायालयाने दिलेला इशारा पालिकेने सहजतेने घेऊ नये असे बजावले. हायक्विपशी करार पालिकेने केला नव्हता तर "सुडा'ने (राज्य नागरी विकास संस्था) केला होता. यासाठी आता या प्रकरणात ज्या तांत्रिक बाबी उपस्थित होतील त्यांचा निपटारा लवकर करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादली.
पालिकेने करार रद्द करण्याबाबत केलेला ठराव आता "सुडा'ला सादर करावा लागणार आहे. "सुडा'ला तो रद्द करावा लागेल. मग हे सारे सोपस्कार पूर्ण करून तसा अहवाल उच्च न्यायालयास दीड महिन्यात सादर करावा लागणार आहे. गेली कित्येक वर्षें पालिकेकडून कचरा प्रकरणी जो घोळ घालत आहे तो पाहता दीड महिन्यात हे काम पूर्ण होणे कठीणच दिसते.
घरोनघर फिरून कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावणे यासाठी साडेसात कोटी खर्चाचा एक प्रस्ताव आला होता. त्यात या कामासाठी जादा २५० कामगार घेण्याची तरतूद होती. तथापि, त्या प्रस्तावाला कडाडून विरोध झाला. असे कामगार घ्यायला पालिका प्रशासन मंजुरी देणार नाही व साडेसात कोटींची रक्कमही मंजूर करणारनाही, यासाठी या कामाचे खाजगीकरण करून त्या कामासाठी निविदा मागविल्या तर नेमका किती खर्च येईल ते कळून येईल, नवे कामगार घेतले की नव्या कटकटी निर्माण होतील असे सांगून घनःश्याम शिरोडकर यांनी पालिकेकडे आज किती कामगार आहेत व ते कोणकोणती कामे करतात ते जाणून खात्री करून घेण्याची गरज प्रतिपादिली .त्यांनी केलेल्या प्रश्नावर १६१ व रोजंदारीवरील ८० मिळून २४१ कामगार असल्याची माहिती मिळाली. मात्र ते कुठे कुठे काम करतात त्याबाबतचा तपशील मिळाला नाही. यावेळी अनेकांनी आपल्या वॉर्डांत हे कामगार फिरकत नसल्याची तक्रार केली. त्यावर नगराध्यक्षांनी या कामगारांना एके दिवशी बोलावून त्यांची परेड घ्यावी व त्याच दिवशी पुन्हा मंडळाची बैठक ठेवावी असा प्रस्ताव शिरोडकर यांनी मांडला तो सर्वांनी मान्य करून पुढच्‌या गुरुवारी (३१ रोजी) सायंकाळी ४ वा. पालिकेची खास बैठक बोलावण्याची घोषणा केली.
कचरा खाजगी करणासाठी निविदा मागवताना अटी व नियमांची विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे करार करताना पालिका अडचणीत येणार नाही, असे सावियो कुतिन्हो यांनी सुचवले.पालिकेची थकबाकी वसुली , सरकारकडून ऍक्ट्रॉयची रक्कम परत घेण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, रस्त्यावरील अतिक्रमणे व प्रत्येक वॉर्डमध्ये कंपोस्ट प्रक्रिया सुविधा उपलब्ध करणे या मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली.

No comments: