Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 July 2008

विश्वासमत संमत होण्याची पंतप्रधानांना खात्री होतीच

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सार्दिन यांचा दावा
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना विश्वासमत ठराव संमत होणार असल्याची पूर्ण खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी डाव्यांच्या दबावाला झुगारून हा ठराव मांडला होता, असे उद्गार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी काढले. भाजप हा सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे विश्वासमत ठरावादरम्यान संपूर्ण देशवासीयांनी पाहिले, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
कॉंग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज सार्दिन बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर व आर्थुर सिक्वेरा हजर होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात डाव्यांनी खो घातल्याने प्रलंबित ठेवण्यात आलेले काही चांगले कायदे तथा निर्णय आता तात्काळ घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कॉंग्रेसला बदनाम करण्यासाठी पैशांच्या नोटा भर संसदेत आणून त्याचा बाऊ करण्याची भाजपची कृती संसदेच्या इतिहासाला काळिमा फासणारी ठरली आहे,असा आरोप सार्दिन यांनी केला. आता खऱ्या अर्थाने अणुकरार पूर्णत्वास येणार असून देशातील वाढती विजेची मागणी या करारामुळे पूर्ण होणार असल्याचे सार्दिन म्हणाले.
पाळी मतदारसंघ कॉंग्रेसकडेच
पाळीमध्ये प्रा. गुरूदास गावस हे कॉंग्रेसचे आमदार होते व त्यांच्या मृत्युमुळे त्या मतदारसंघात कॉंग्रेस पक्षच आपला उमेदवार उतरवणार आहे. परिणामी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघावर दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असे सार्दिन म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी केलेल्या दाव्याबाबत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. या गोष्टी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून सोडवल्या जातील,असे ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पाळी मतदारसंघावर डोळा ठेवून असली तरी या मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी वावरण्याची वेळ त्यांच्यावर येणार असल्याचा टोमणा उपाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांनी हाणला. पाळीतील उमेदवार निश्चित करताना सभापती प्रतापसिंह राणे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना विश्वासात घेतले जाईल, असेही सार्दिन यांनी सांगितले.

No comments: