नवी दिल्ली, दि.२२ : लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेवर आज इतिहासातील सर्वात काळा दिवस पाहण्याचा प्रसंग ओढवला. संसदेचे पावित्र्य अबाधित राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्याच सत्ताधाऱ्यांनी विशेषत: कॉंगे्रसने संसदेची प्रतिष्ठा धुळीस मिळविली. संपुआ सरकार वाचविण्यासाठी कॉंगे्रसने सपा नेत्यांच्या माध्यमातून भाजपच्या तीन खासदारांना दिलेल्या प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या लाचेची रक्कम हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आज संध्याकाळी थेट लोकसभेतच सादर करण्यात आली.
लोकसभेच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला असून, तो अतिशय दुर्दैवी असाच आहे. कॉंग्रेसने लाच दिल्याच्या या घटनेची व्हीडिओ रेकॉर्डिंग तयार करण्यात आली असून, ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपच्या या तिन्ही खासदारांनी सपाचे सरचिटणीस अमरसिंग आणि कॉंगे्रसाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे नाव घेतले आहे. या दोघांनी रेवती रमणसिंग यांच्या माध्यमातून आपल्याला हे पैसे दिल्याचे भाजपच्या खासदारांनी म्हटले आहे.
या घटनेचे संतप्त पडसाद राजकीय वर्तुळात आणि देशभरात उमटले असून, संपुआ सरकारची सर्वत्र तीव्र निंदा करण्यात येत आहे. भाजप, डावे, बसपासह विविध राजकीय पक्षांनी संपुआ सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सरकारला एक क्षणही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे या पक्षांनी स्पष्ट केले.
केंद्रातील आपले संपुआ सरकार वाचविण्यासाठी कॉंगे्रसच्या नेत्यांनी भाजपाचे तीन खासदार खरेदी करण्याचा प्रयत्न चालविला खरा. पण, या निष्ठावान खासदारांनी लगेच याबाबतची सूचना भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिली. "सरकारच्या बाजूने मतदान करा किंवा मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहा आणि २५ कोटी रुपये मिळवा,' असा हा कॉंगे्रसचा प्रस्ताव होता.
कालच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपले सरकार अशा कोणत्याही गैरकृत्यात सहभागी नसल्याचे दाव्यासह सांगताना "शुभ कर्म करणाऱ्यांना कुठलीच भीती नसते,' या गुरू गोविंदसिंग यांच्या वाक्याची आठवण करून दिली होती. त्यातच लालकृष्ण अडवाणी यांनी खासदारांना २५ कोटी रुपयांची लाच देण्यात येत असल्याची माहिती सभापती सोमनाथ चॅटर्जी यांना दिली असता त्यांनी ठोस पुरावे मागितले होते. अशातच तीन खासदारांनी दिलेली माहिती पुरावा म्हणून सादर करण्याचा आणि यासाठी स्टिंग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय अडवाणी यांनी घेतला.
आज सकाळी भाजपचे तीन खासदार फागनसिंह कुलस्ते, अशोक अर्गल आणि महावीर भगोडा यांना कॉंगे्रसच्या नेत्याचे निवासस्थान असलेल्या ४, फिरोजशाह रोड येथील निवासस्थानी बोलावण्यात आले. तिथे त्यांना प्रत्येकी २५ कोटी रुपये देण्याची "ऑफर' देताना एक-एक कोटी रुपयांचे तीन पॅकेट तिघांनाही देण्यात आलेत. हे पॅकेट घेऊन हे तिन्ही खासदार थेट अडवाणी यांच्याकडे आले आणि सर्व प्रकार कथन केला.
लोकसभेत हे पैसे नेण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांनी अडवाणी यांना सांगितले. तेव्हा अडवाणी यांनी अशा प्रकाराला संसदेच्या नियमात परवानगी नसली तरी हा प्रकार गंभीर असल्याने तो सभागृहासमोर आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. अडवाणी यांची परवानगी घेऊन अशोक अर्गल यांनी सर्वप्रथम एक कोटी रुपयांचे बंडल लोकसभेत दाखविले. त्यांच्यापाठोपाठच अन्य दोन सदस्यांनीही आपल्याकडील पॅकेट दाखविले. हा गंभीर प्रकार पाहून सभापती सोमनाथ चॅटर्जी देखील थक्क झाले. त्यांनी लगेच संसदेचे थेट प्रक्षेपण थांबविण्याचे आदेश देताना सभागृहाचे कामकाज सायंकाळी ६ वाजेपर्यंत तहकूब केले. तत्पूर्वी, आपले बिंग उघड पडल्याचे पाहून कॉंगे्रस आणि अन्य सत्ताधारी सदस्यांनी जोरजोरात घोषणा देत सभागृहाबाहेर पाय काढला.
आम्हाला पुरावे मागणाऱ्या लोकसभा सभापतींनीच आता या घटनेची विस्तृत चौकशी करावी, अशी मागणी अडवाणी यांनी केली. हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. सभापतींनी त्याची गांभीर्याने दखल घ्यायलाच हवी, असे ते म्हणाले.
माझ्या तीन खासदारांना मतदानाला अनुपस्थित राहण्यासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव देताना एक कोटी रुपये अग्रीम म्हणून देण्यात आले. हे सरकार खासदारांची खरेदी करून स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माझ्याकडून आणि अन्य राजकीय पक्षांकडून वारंवार होत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता तर ठोस पुरावेच सादर करण्यात आले आहेत. मी माझ्या आजवरच्या राजकीय आयुष्यात इतका निर्लज्ज प्रकार कधीच बघितला नाही. आजचा हा दिवस संसदेच्या आणि भारतीय राजकारणाच्या इतिहासात खरोखरच दुर्दैवी आहे.
अमरसिंग यांचा फोन होता
एक कोटी रुपये लोकसभेत सादर करणारे अशोक अर्गल यांनी सपा नेते अमरसिंग आणि कॉंगे्रस नेते अहमद पटेल यांचे नाव घेतले आहे. अमरसिंग यांनी मला फोन केला आणि मतदानाला अनुपस्थित राहण्यासाठी २५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला. आता एक कोटी घ्या आणि उर्वरित रक्कम लवकरच प्राप्त होईल, असे सांगताना, "प्रस्ताव मान्य असेल तर ४, फिरोजशाह रोड येथील बंगल्यावर जा' असे कळविले, असे त्यांनी सांगितले.
झामुमो खासदार खरेदी-विक्रीची आठवण
१९९१ मध्ये नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील कॉंगे्रस सरकार अल्पमतात असताना त्यावेळीही अशाच प्रकारे खासदार खरेदी करण्याचे प्रकार घडले होते. यासाठी अतिशय कमजोर असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लक्ष्य बनविण्यात आले होते. तेव्हा झामुमोच्या प्रत्येक खासदाराला २५ ते ४० लाख रुपयांची लाच देण्यात आली होती. नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आपले सरकार वाचविण्यासाठी आपल्या गुरूंनाही मागे टाकले. त्यांनी आज खासदारांचा भाव २५ ते १०० कोटी रुपये इतका लावला.
Tuesday, 22 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment